मुंबई: ॲपआधारित अत्यल्प दलाली शुल्क आकारणारी आणि तंत्रज्ञानसुलभ समभाग खरेदी-विक्रीचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या ‘ग्रो’ने प्रारंभिक समभाग विक्रीची योजना (आयपीओ) आखली आहे. ‘ग्रो’ची पालक कंपनी असलेल्या बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स ने माध्यमातून सुमारे ८,६०० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले असून, त्याची तयारी म्हणून पाच गुंतवणूक बँकांची निवडीची प्रक्रिया सुरू केल्याचे शुक्रवारी सूचित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटक महिंद्र कॅपिटल, जेपी मॉर्गन, ॲक्सिस कॅपिटल, सिटी आणि मोतीलाल ओसवाल यांची गुंतवणूक बँकांची ‘आयपीओ’साठी निवड करण्यात आली आहे. येत्या आठवड्यात आयपीओसंबंधित तयारी सुरू केली जाण्याची शक्यता असून, एप्रिल-मे महिन्यापर्यंत आयपीओचा मसुदा प्रस्ताव बाजार नियामक ‘सेबी’कडे दाखल केला जाऊ शकेल. आगामी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये हा आयपीओ बाजारात धडकण्याची शक्यता आहे.

‘ग्रो’ने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी ७ ते ८ अब्ज डॉलरचे मूल्यांकनाचे लक्ष्य ठेवून, अनेक गुंतवणूक बँकांशी चर्चा सुरू केली आहे. काही गुंतवणूक बँकांनी १० अब्ज डॉलरपर्यंतचे उच्च मूल्यांकन देखील प्रस्तावित केले आहे. मात्र आयपीओ मूल्यांकनाबाबत निर्णय हा अंतिम टप्प्यात घेतला जाण्याची शक्यता आहे. आयपीओचे आकारमान आणि वेळ निश्चित ठरल्यानंतरच ते निश्चित होईल.

‘ग्रो’ पहिल्या क्रमांकावर

‘ग्रो’ने गेल्या वर्षी सक्रिय गुंतवणूकदारांच्या संख्येच्या बाबतीत तिच्या प्रतिस्पर्धी झिरोधाला मागे टाकले. नोव्हेंबर २०२४ पर्यंत तिने ५० लाखांहून अधिक वापरकर्ते जोडले आहेत. बाजारमंचाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२४ अखेर ‘ग्रो’कडे १.३ कोटी सक्रिय गुंतवणूकदार होते. तर झिरोधाकडे ८१ लाख आणि एंजल वनकडे सुमारे ७८ लाख सक्रिय गुंतवणूकदार आहेत.