मुंबई : म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील सर्वतोमुखी आणि लोकप्रिय अशा नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून सरलेल्या जुलै महिन्यात २३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक आली. जून महिन्यातील २१,२६२ कोटी रुपयांपेक्षा सरलेल्या महिन्यातील ओघ अधिक राहिला, अशी माहिती म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संस्था - असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात ‘ॲम्फी’ने शुक्रवारी दिली. ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात नोंदणीकृत ‘एसआयपी’ खात्यांची संख्या ७२,६१,९२८ होती. जून महिन्यात ‘एसआयपी’च्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) १२.४३ लाख कोटी रुपये होती. ती जुलै महिन्यात १३.०९ लाख कोटींवर पोहोचली आहे. ‘एसआयपी’ खात्यांच्या संख्येनेदेखील ९.३३ कोटींचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे, याआधीच्या महिन्यात ‘एसआयपी’ खात्यांची संख्या ८.९८ कोटी होती. हेही वाचा >>> Share Market Update : जागतिक सकारात्मकतेने ‘सेन्सेक्स’मध्ये ८२० अंशांची भर इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये मार्च २०२१ पासून आतापर्यंत सलग ४१ महिन्यांमध्ये सकारात्मक प्रवाह दिसून आला. जुलैमधील वाढ मुख्यतः समभागसंलग्न (इक्विटी) योजनांशी निगडित राहिली. या योजनांत ३७,११३.३९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मात्र जून महिन्याच्या तुलनेत त्यात ८.६१ टक्क्यांची घसरण झाली आहे. हेही वाचा >>> ‘एलआयसी’चे भाग गुंतवणुकीचे मूल्य १५ लाख कोटींपुढे; सव्वा तीन वर्षात दुपटीहून अधिक वाढ म्युच्युअल फंड उद्योगाने सकारात्मक वाढ दर्शविली आहे. ‘एसआयपी’ खात्यांची वाढती संख्या आणि विक्रमी योगदानातून गुंतवणूकदारांमधील वाढती विश्वासार्हता निदर्शनास येत असून, किरकोळ गुंतवणूकदारांमधील वाढती आर्थिक शिस्तीलाही ते दर्शवते. म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांच्या आर्थिक नियोजनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. ज्यामुळे त्यांना कालांतराने पद्धतशीरपणे संपत्ती निर्माण करण्यास मदत होते, असे ‘ॲम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट चालसानी म्हणाले. एकूण मालमत्ता ६५ लाख कोटींच्या उंबरठ्यावर म्युच्युअल फंड घराण्यांच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेत जुलै महिन्यात ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही मालमत्ता आता ६४.६९ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विद्यमान महिन्यात ती ६५ लाख कोटींपुढे जाण्याची आशा आहे. तर त्याआधीच्या जून महिन्यात ती ६०.८९ लाख कोटी रुपये होती.