मुंबई : सरलेल्या जानेवारी ते जून २०२५ या पहिल्या सहामाहीत स्कोडा ऑटो इंडियाने ३६,१९४ वाहनांची विक्री केली. कंपनीच्या भारतातील २५ वर्षाच्या कार्यकाळात झालेली ही सर्वाधिक सहामाही विक्री आहे. जागतिक स्तरावर ही कंपनी १३० वा वर्धापन दिवस साजरा करत आहे.
स्कोडा ऑटोने सरलेल्या सहा महिन्यात ऐतिहासिक उच्चांकी वाहन विक्री केली असून हे भारतातील ग्राहकांकडून स्कोडाच्या उत्पादने आणि सेवांना मिळत असलेल्या स्वीकृतीचे प्रतिबिंब आहे, असे स्कोडा ऑटो इंडियाचे नाममुद्रा संचालक आशीष गुप्ता म्हणाले. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ३६,१९४ वाहनांच्या विक्रीसह, स्कोडा ऑटो इंडियाने आता देशातील आघाडीच्या सात वाहन निर्मात्यांमध्ये स्थान मिळविले आहे.
२०२४ मधील क्रमवारीच्या तुलनेत ही चार स्थानांची झेप आहे. याआधी २०२२ मध्ये पहिल्या सहामाहीत स्कोडाने २८,८९९ इतकी वाहन विक्री नोंदवली होती. २०२१ मधील १२० संपर्कबिंदूवरून, कंपनीने तिचे सेवा जाळे २९५ हून अधिक संपर्कबिंदूंपर्यंत विस्तारले असून, २०२५ अखेरपर्यंत ते ३५० वर नेण्याचे कंपनीचे नियोजन आहे.