लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी मुंबई : गेल्या आठवड्यात प्रारंभिक समभाग विक्री केलेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, फर्स्टक्राय आणि युनिकॉमर्स या नवउद्यमी उपक्रमांनी ‘आयपीओ’ला भरभरून प्रतिसादानंतर, भांडवली बाजारात दमदार सूचिबद्धतेसह, गुंतवणूकदारांना पदार्पणात बहुप्रसवा परतावा दाखविला आहे. जपानच्या सॉफ्टबँकेची या तिन्ही कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक असून ती त्यातील मोठी प्रवर्तक कंपनी आहे. आतापर्यंत सॉफ्ट बँकेने ओला इलेक्ट्रिक, फर्स्टक्राय आणि युनिकॉमर्समधील सुमारे ७,०८५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर १०६ टक्के अधिक नफा कमावला आहे. सॉफ्टबँकेचीच गुंतवणूक असणाऱ्या पेटीएम अर्थात वन ९७ कम्युनिकेशनचे समभाग मात्र ‘आयपीओ’पश्चात बाजार पदार्पणालाच गडगडले होते. अखेर खुद्द सॉफ्टबँकेला ही गुंतवणूक तोट्यासह मोडावी लागली. तरी या कटू अनुभवाने हात पोळलेले सामान्य गुंतवणूकदार आता पुन्हा नवउद्यमींबाबत आश्वासक कल दाखवत असल्याचे मागील काही दिवसांत सूचिबद्धतेला नवउद्यमींनी मिळविलेले अधिमूल्य दाखवून देते. हेही वाचा >>>येस बँकेतील हिस्सेदारी स्टेट बँक विकणार? मार्चपर्यंत १८,४०० कोटी मूल्याची भागधारणा निकाली काढण्याचे लक्ष्य विद्युत शक्तीवर चालणाऱ्या दुचाकींची विक्री करणाऱ्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा समभाग मंगळवारच्या सत्रात १०८.७१ रुपयांवर बंद झाला. कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून ७६ रुपयांना तो गुंतवणूकदारांना दिला होता. म्हणजेच बाजारात पदार्पण झाल्यापासून तीन सत्रात समभाग ७१ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. कंपनीचे बाजारभांडवल ५०,००० कोटींवर जाऊन पोहोचले आहे. त्यापाठोपाठ मंगळवारी बाजारात सूचिबद्ध झालेल्या ‘युनिकॉमर्स ई-सोल्युशन’च्या समभागांनी पदार्पणच ९६ टक्क्य़ांच्या मुसंडीने केले. गुंतवणूकदारांना प्रत्येकी १०८ रुपये किमतीला वितरित केले गेलेले युनिकॉमर्सच्या समभागांत मंगळवारी २३० रुपये (३०.९ टक्के अधिक) किमतीला प्रारंभिक व्यवहार झाला. दिवसभरात त्याने १३७.१७ टक्क्यांची झेप घेत २५६.१५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. दिवसअखेर तो ९४.५२ रुपयांनी वधारून २१०.०८ रुपयांवर बंद झाला. ‘फर्स्टक्राय’ची पालक कंपनी असलेल्या ब्रेनबीज सोल्युशन्सचा समभाग प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या ४६५ रुपयांच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी वधारून ६२५ रुपयांवर सूचिबद्ध झाला. दिवसअखेर तो ४६.०६ टक्क्यांनी वधारून ६७९.१० रुपयांवर स्थिरावला.