अदाणी समूहावर SBI च्या कर्जाचा डोंगर, बँकेने दिली माहिती; जाणून घ्या | state bank of india given loan adani companies 2.6 billion | Loksatta

अदाणींच्या आर्थिक संकटाचा भार SBI वर पडणार? हजारो कोटींचं दिलंय कर्ज! बँकेचे अध्यक्ष म्हणतात…

अदाणी समूहावरील आरोपांची विरोधी पक्षाने चौकशीची मागणी केली आहे.

Adani
गौतम अदाणी (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अमेरिकास्थित गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहावर फसवे व्यवहार आणि समभागांच्या किमती फुगवणाऱ्या लबाड्यांसह अनेक आरोप केले आहेत. अदाणी समूहाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तरी, विश्लेषक आणि गुंतवणूकदारांना ते पटवून देण्यात अपयशी ठरले. परिणामी गुरुवारी ( २ जानेवारी ) सलग सहाव्या सत्रात समूहाच्या बहुतांश कंपन्यांचं समभाग घसरले. आतापर्यंत समूहातील १० कंपंन्यांचं तब्बल ८.७६ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

‘हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने ( एसबीआय ) आणि भारतीय जीवन आयुर्विमा ( एलआयसी ) ने अदाणी समूहाला दिलेल्या कर्जाबद्दल सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अशातच ‘एसबीआय’ने अदाणी समूहाला दिलेल्या कर्जाची माहिती दिली आहे. अदाणी समूहाला ‘एसबीआय’ने २.६ बिलियन डॉलर ( २१ हजार कोटी रुपये ) कर्ज दिलं आहे. तसेच, २०० मिलियन परदेशी युनिटचा देखील सहभाग ‘एसबीआय’ने दिलेल्या कर्जात आहे.

हेही वाचा : ‘Hindenburg’च्या आरोपांनंतर अदाणी समूहाकडून ४१३ पानांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “हा भारतावर…”

‘एसबीआय’चे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी सांगितलं, “अदाणी समूह आपल्या कर्जाची परतफेड करत आहे. बँकेने दिलेल्या कर्जाबद्दल कोणतीही काळजी करण्याचं कारण आता दिसत नाही.” पण, गुरुवारी रिझर्व्ह बँकेने ( आरबीआय ) अदाणी समूहाला दिलेल्या कर्जाला तपशील सादर करण्याचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत.

हेही वाचा : Adani Shares: अदाणींच्या शेअर्सची वाताहत सुरूच; एकूण ११८ अब्ज डॉलर्सचा फटका!

दरम्यान, अदाणी समूहाच्या कथित गैरव्यवहारांचा मुद्दा गुरुवारी विरोधी पक्षाने संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडत गोंधळ घातला. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ अहवालातील आरोपांची संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली. या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 08:17 IST
Next Story
शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स ४०८ अकांनी खाली, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्सही १० टक्क्यांची घसरले