सन्सेरा इंजिनीअरिंग लिमिटेड, ही भारतीय कंपनी १९८१ मध्ये बेंगळूरुमध्ये स्थापन झाली. त्यानंतर १५ वर्षांत कंपनीने प्रवासी वाहने, दुचाकी वाहने, हलकी वाणिज्य वाहने तसेच ‘ऑफ रोड’ वाहनांना पुरवठा सुरू करून भारतात प्रीसीशन इंजिनीअरिंग उत्पादन व्यवसाय वाढवला. वर्ष २०१३ मध्ये कंपनीने ‘हाय प्रीसीशन ॲल्युमिनियम’ आणि ‘टायटॅनियम मशीन्ड एरोस्पेस’ घटकांसाठी समर्पित उत्पादन सुविधा स्थापन केली. त्यानंतर एप्रिल २०१७ मध्ये, कंपनीने सन्सेरा स्वीडनमध्ये १०० टक्के हिस्सा विकत घेतला. ज्यामुळे ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील हेव्ही व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रात कंपनीचा प्रवेश सुलभ झाला आणि भारताबाहेरील ‘ओईएम’पर्यंत भौगोलिक प्रवेश सुधारला. सन्सेरा इंजिनीअरिंग लिमिटेड ही ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील जटिल आणि प्रीसीशन इंजिनीअर केलेल्या घटकांची अभियांत्रिकी उत्पादक आहे. कंपनी ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी विस्तृत श्रेणीतील विविध प्रीसीशन इक्विपमेंट उत्पादित करते आणि पुरवते तसेच नॉन-ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी ती ‘एरोस्पेस’, ‘ऑफ-रोड’, शेती आणि इतर विभागांसाठी विस्तृत श्रेणीतील उत्पादने करते आणि पुरवते. कंपनीने ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह क्षेत्रात आघाडीच्या उत्पादकांपैकी एक म्हणून स्वतःची स्थापना केली आहे. हलके वाहन विभाग आणि वाणिज्य वाहन विभागातील ‘कनेक्टिंग रॉड्स’च्या दहा जागतिक पुरवठादारांपैकी एक प्रमुख पुरवठादार कंपनी आहे.

उत्पादन प्रकल्प

आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत, कंपनीकडे १६ उत्पादन सुविधा असून त्यापैकी १५ भारतात कर्नाटक, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांमध्ये आहेत तर एक सुविधा प्रकल्प स्वीडनमध्ये आहे. इटली आणि अमेरिकेत कंपनीची सेवा केंद्रे आहेत. कंपनी ५९१ कोटी भांडवली खर्चाचे दोन प्रकल्प उभारत असून त्यातील एक कर्नाटकात तर दुसरा पंतनगर येथे आहे. हे दोन्ही प्रकल्प येत्या दोन वर्षांत सुरू होतील.

व्यवसाय विभाग

ऑटोमोटिव्ह विभाग: या विभागांतर्गत, कंपनी दुचाकी, प्रवासी वाहन आणि वाणिज्य वाहनांसाठी कनेक्टिंग रॉड, रॉकर आर्म, क्रँकशाफ्ट इत्यादी अचूक बनावट आणि मशीन केलेले घटक आणि ‘असेंब्ली’ची श्रेणी तयार करते आणि पुरवते.नॉन-ऑटोमोटिव्ह विभाग: या विभागांतर्गत, कंपनी एरोस्पेस, ऑफ-रोड, शेती आणि अभियांत्रिकी आणि भांडवली वस्तूंसह इतर विभागासाठी प्रीसीशन घटकांची श्रेणी उत्पादित करते आणि पुरवते.

महसूल मिश्रणआर्थिक वर्ष २०२५
ऑटो आयसीई७३%
ऑटो-टेक अग्नोस्टिक आणि एक्स ईव्ही१५%
नॉन-ऑटो१२%
भौगोलिक विभाजनआर्थिक वर्ष २०२५
भारत६९%
युरोप१८%
यूएसए९%
इतर४%

कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत सर्व प्रमुख टू व्हीलर उत्पादक बजाज, हार्ले डेव्हिडसन, हिरो, एचएमएसआय, केटीएम, रॉयल एनफील्ड, यामाहा तसेच प्रवासी वाहनांमध्ये एफसीए, होंडा कार्स, मारुती सुझुकी, टोयोटा, फोक्सवॅगन इ. मोठे उत्पादक आहेत. एलसीव्ही/एचसीव्ही सेग्मेंट साथी अशोक लेलँड, सीएनएचआय तसेच जपान, जर्मन आणि स्वीडिश कंपनीचा समावेश आहे. या खेरीज एरोस्पेस विभागासाठी बोईंग, यूटीएएस, एक अग्रगण्य युरोपियन ओईएम आणि ऑफ-रोड वाहने आणि इतर विभागासाठी बॉश, जेसीबी, पोलारिस प्रमुख ग्राहक आहेत.

कंपनीने जिगानी होबली, बेंगळूरु येथे एक मोठी एरोस्पेस आणि डिफेन्स सुविधा स्थापन केली आहे. कंपनीच्या १,४०,००० चौरस फूट जागेवर २/३ जागा एरोस्पेससाठी आणि १/३ जागा संरक्षणासाठी आहे. कंपनीकडे त्यासाठी १५३ कोटी रुपयांचे कार्यादेश असून पूर्ण क्षमतेच्या वापरावर त्यांची ३५० कोटी रुपयांची महसूल क्षमता आहे. तसेच यासाठी एक धोरणात्मक गुंतवणूक म्हणून कंपनीने कंपनीने ‘एमएमआरएफआयसी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये सुमारे २१ टक्के हिस्सा ताब्यात घेऊन २० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ‘एमएमआरएफआयसी’ ही एक संशोधन, डिझाइन आणि उत्पादन संस्था आहे, जी कृत्रिम बुद्धिमत्तेसह ‘मशीन लर्निंग आणि हायब्रिड बीम फॉर्मिंग’ क्षमतांसह ‘एमएम-वेव्ह सेन्सर’चा वापर करून पुढील पिढीच्या रडारसाठी उपप्रणाली तयार करते. कंपनीला आपला हिस्सा ५१ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा अधिकार आहे. कंपनीने मार्च २०२५ साठी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी ३,०१७ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर २१५ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १६ टक्क्यांनी अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सन्सेराचे कार्यादेश १,८५१ कोटी रुपये आहे, जे पुढील ३ वर्षांत पूर्ण होईल. सध्या १,३७५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून फायद्याचा ठरेल.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

सन्सेरा इंजिनीअरिंग लिमिटेड (बीएसई कोड: ५३३३५८)

संकेतस्थळ : sansera.in

प्रवर्तक: सेखर वासन

बाजारभाव: रु. १३८४/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : इंजिनीअरिंग/ ऑटो

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १२.३८ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ३०.३५

परदेशी गुंतवणूकदार २०.१०

बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ३७.०६

इतर/ जनता १२.४९

पुस्तकी मूल्य: रु. ४४४

दर्शनी मूल्य: रु. २/-

गतवर्षीचा लाभांश: १६३%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ३४.८

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३९.८

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २८

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१५

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ५.१७

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): १३.३%

बीटा :१.२

बाजार भांडवल: रु. ८५७३ कोटी (स्मॉल कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १७५८/९५३

गुंतवणूक कालावधी : ३६ महिने

stocksandwealth@gmail.com प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा गुंतवणूक सल्ला नाही

लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.