मुंबई : येत्या १ फेब्रुवारीला रविवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहार नियमितपणे सुरू ठेवण्याचा निर्णय दोन्ही बाजार मंचांनी शुक्रवारी घेतला.

साधारणपणे शनिवारी आणि रविवारी भांडवली बाजारातील व्यवहार बंद असतात. मात्र गेल्यावर्षी म्हणजेच १ फेब्रुवारी २०२५ रोजी शनिवारी अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यावेळीही शनिवारी भांडवली बाजारातील व्यवहार खुले ठेवण्यात आले होते.

मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) याबाबत घोषणा केली असून, २०२६ च्या अर्थसंकल्पासाठी १ फेब्रुवारी रोजी शेअर बाजार ट्रेडिंगसाठी खुला राहील. त्या दिवसाचे वेळापत्रक नेहमीच्या वेळेनुसार असेल. १ फेब्रुवारी २०२६ रोजी नेहमीच्या बाजार वेळेनुसार सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत नियमितपणे व्यवहार पार पडतील.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२६-२७ साठी सलग नववा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील, जो स्वातंत्र्यानंतरचा भारताचा ८०वा अर्थसंकल्प असेल. २०१७ मध्ये, केंद्र सरकारने १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पाची तारीख २८ फेब्रुवारीवरून १ फेब्रुवारी निश्चित केली.

वर्ष २००० नंतर रविवारच्या दिवशी अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ असली तरी, आठवड्याच्या शेवटी अर्थसंकल्प सादर करणे ही काही अभूतपूर्व घटना नाही. सीतारामन यांच्या कार्यकाळात २०२५ चा अर्थसंकल्प शनिवारी सादर करण्यात आला होता आणि अरुण जेटली यांच्या कार्यकाळात २०१५ चा अर्थसंकल्प देखील २८ फेब्रुवारी २०१५ रोजी शनिवारी सादर करण्यात आला होता.

अर्थसंकल्पापूर्वी, देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन हे आर्थिक पाहणी अहवाल संसेदेत सादर करतील, त्यानंतर नागेश्वरन आणि वरिष्ठ अधिकारी पत्रकार परिषदेलाही संबोधित करतील.