मुंबई: परकीय गुंतवणूकदारांकडून अथकपणे सुरू राहिलेल्या विक्रीने सलग पाचव्या सत्रात निर्देशांक आणखी जवळपास टक्काभराने शुक्रवारी गडगडला. ताज्या घसरणीतून सेन्सेक्सने ८० हजारांची पातळी सोडली. या सलग घसरणीसह, दोन्ही निर्देशांकांनी गत १४ महिन्यांतील सर्वाधिक नुकसानकारक सप्ताहाची अनुभूती देतानाच, ऐन दिवाळीच्या तोंडावर तब्बल १० लाख कोटींच्या संपत्तीची धूप झाल्याचे हताशपणे पाहण्याचा घाव गुंतवणुकदारांना दिला.
सत्रारंभापासून नकारात्मक कल राहिलेल्या भांडवली बाजारात, शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्स ६६२.८७ अंशांच्या (०.८३ टक्के) घसरणीसह ७९,४०२.२९ या पातळीवर स्थिरावला. एकेसमयी या निर्देशांकाची ९२७.१८ अंशांची आपटी पाहता, ७९ हजारांची पातळीही त्याला राखता येणार नाही, अशी भीती निर्माण झाली होती. तथापि या नीचांकातून तो काहीसा सावरला. दुसरीकडे निफ्टीने आणखी २१८.६० अंशांच्या (०.९२ टक्के) तोटा दाखवत, २४,१८०.८० या पातळीवर दिवसअखेर विश्राम घेतला. बाह्य कारणांबरोबरीनेच, अपेक्षेपेक्षा वाईट कंपन्यांची तिमाही कामगिरी बाजारातील नकारात्मकतेला खतपाणी घालत आहे.
हेही वाचा >>> Gold Silver Rate Today : ग्राहकांना दिलासा! दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भाव काय?
चिनी सरकारच्या अर्थ-प्रोत्साहनपर उपायांबाबत आशावाद आणि तुलनेने स्वस्त मूल्यांकनाला उपलब्ध समभाग यामुळे परकीय गुंतवणूकदारांच्या निधी मोठ्या प्रमाणाव चीनकडे वळत आहे. विद्यमान ऑक्टोबर महिन्यांतील काही सत्रांमध्ये त्यांनी जवळपास लाख कोटी रुपयांच्या मूल्याची समभाग विक्री स्थानिक बाजारात केली आहे. करोनाछायेतील मार्च २०२० नंतरची ही त्यांच्याकडून झालेली आजवरची सर्वाधिक विक्री आहे.
तिमाही निकालातील अपेक्षाभंग
विशेषत: उपभोगाशी संबंधित क्षेत्रे आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांकडून निराशाजनक तिमाही मिळकत कामगिरीवर गुंतवणूकदारांकडून तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शुक्रवारी निकाल जाहीर करणाऱ्या इंडसइंड बँकेच्या तिमाही नफ्यातील आश्चर्यकारक घट दिसून आली आणि त्याचा बँकेच्या समभागाला १८.६ टक्के घसरणीचा फटका बसला. मायक्रोफायनान्स कर्जावरील ताणामुळे बँकेने केलेल्या उच्च तरतुदी आणि घसरलेल्या पत गुणवत्तेबाबत गुंतवणूकदार चिंतित दिसले. दुसरीकडे कमी वीजनिर्मितीमुळे तिमाही नफा घटलेल्या एनटीपीसीचा समभाग ३.२ टक्क्यांनी आपटला. त्याउलट ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील आयटीसी लिमिटेडचा तिमाही नफा अपेक्षेपेक्षा सरस आला. ज्यामुळे हा समभाग २.२५ टक्के वाढीसह निर्देशांकातील सर्वोत्तम कामगिरी करणारा समभाग ठरला.
मार्च २०२० च्या पडझडीचा पुन्हा आठव
सरलेल्या २७ सप्टेंबरच्या शुक्रवारी सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी त्यांनी सार्वकालिक अत्युच्च पातळी नोंदवली होती. त्यानंतर व्यवहार झालेल्या १९ सत्रांमध्ये निरंतर सुरू राहिलेल्या विक्रीच्या माऱ्याने निफ्टीने तब्बल ८ टक्क्यांचे नुकसान सोसले आहे. मार्च २०२० मध्ये करोनाचे सावट आणि त्यासाठी लागू झालेल्या टाळेबंदीच्या भीतीने बाजाराने अनुभवलेल्या मोठ्या पडझडीची आठवण यातून पुन्हा जागवली गेली आहे. कारण त्यानंतर कोणत्याही महिन्यांत निर्देशांकांचे इतका मोठा केव्हाही बसलेला नाही. सरलेल्या सप्ताहात विक्रीचा जोर इतका सर्वव्यापी होता की, स्मॉल व मिडकॅपकेंद्रित निर्देशांक आठवड्याभरात अनुक्रमे ६.५ टक्के आणि ५.८ टक्के गडगडले आहेत.
आकडे-
सेन्सेक्स – ७९,४०२.२९ घसरण ६६२.८७ (०.८३ टक्के)
निफ्टी – २४,१८०.८० घसरण २१८.६० (०.९२ टक्के)
डॉलर – ८४.०८ वाढ १ पैसा
ब्रेंट क्रूड – ७४.६९ वाढ ०.४२ टक्के