मुंबई : अमेरिकी अर्थ-कमकुवतपणा सूचित करणारी आकडेवारी आणि त्या परिणामी जगभरातील बाजारांमध्ये झालेल्या समभाग विक्रीच्या माऱ्याने देशांतर्गत भांडवली बाजारातही शुक्रवारी प्रमुख निर्देशांक १ टक्क्याहून अधिक गडगडले. सेन्सेक्समध्ये ८८५ अंशांची गटांगळी, तर निफ्टी पुन्हा २५ हजारांखालील पातळीवर परतला. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना शुक्रवारच्या सत्रात झालेल्या पडझडीची सर्वाधिक झळ बसली. शुक्रवारच्या सत्राअखेर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८८५.६० अंशांनी म्हणजेच १.०८ टक्क्यांनी घसरून ८०,९८१.९५ पातळीवर बंद झाला. सत्रात ९९८.६४ अंशांपर्यंत घसरण विस्तारत त्याने ८०,८६८.९१ या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या २५,००० च्या पातळीपासून माघारी फिरला. हा निर्देशांक २९३.२० अंशांच्या घसरणीसह दिवसअखेर २४,७१७.७० पातळीवर स्थिरावला. हेही वाचा >>> ‘बैजूज-बीसीसीआय’च्या सामंजस्याला ‘एनसीएलएटी’ची मान्यता सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, महिंद्र अँड महिंद्र, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्र, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला. मात्र या पडझडीतही एचडीएफसी बँक, सन फार्मास्युटिकल्स, कोटक महिंद्र बँक, नेस्ले इंडिया आणि एशियन पेंट्सची कामगिरी चांगली राहिली. अमेरिकेतील बड्या तंत्रज्ञान कंपन्यांची घटलेली कमाई, बेरोजगारांच्या संख्येत वाढ, बँक ऑफ जपानकडून व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता आणि चीनमधील संभाव्य मंदीची भीती यासारख्या जागतिक प्रतिकूल घटनांमुळे बाजाराचा मंदीवाल्यांनी ताबा घेतला. परिणामी, सलग पाच सत्रातील तेजी ओसरली. याचबरोबर सरलेल्या जून तिमाहीत बाजारातील बहुतांश कंपन्यांची कामगिरी निराशाजनक राहिली असून व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे वाढलेले मूल्यांकन चिंतेचा विषय ठरला आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. हेही वाचा >>> यंदा ५१ लाख अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल; ७२ टक्के करदात्यांची नवीन प्रणालीला पसंती गुंतवणूकदारांना ४.४६ लाख कोटींची झळ शुक्रवारच्या सत्रात झालेल्या पडझडीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४.४६ लाख कोटी रुपयांची घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल आता ४५७.१६ लाख कोटींपर्यंत अर्थात ५.४६ ट्रिलियन डॉलरपर्यंत खाली आले आहे. सेन्सेक्स ८०,९८१.९५ -८८५.६० (-१.०८%) निफ्टी २४,७१७.७० -२९३.२० (-१.१७%) डॉलर ८३.७५ २ तेल ८०.१३ ०.७७