मुंबईः डिजिटल बँकिंग आणि देयक सेवा प्रदात्या नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीजने (एनपीएसटी) ईआरपी सॉफ्टवेअर प्रणाली प्रदात्या इन्फिनिटी इन्फोवेशी भागीदारी करून ‘टाइमपे प्रीपेड कार्ड’ नुकतेच प्रस्तुत केले. एनएसडीएल पेमेंट बँकेच्या सहयोगाने ही प्रणाली देशभरात टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल.
हे एक ओळख-संलग्न डिजिटल देयक व्यवहारांना सक्षम करणारे प्रीपेड कार्ड असून, ते ईआरपी-एकात्मिक मंचासाठी सर्व व्यवसाय विभाग एका छताखाली सॉफ्टवेअर प्रणाली या रूपातही कार्य करेल, असा दावा उभय भागीदारांकडून करण्यात आला. कार्डाच्या या वैशिष्ट्यामुळे ते शाळा, महाविद्यालयांचे व्यवस्थापन, लॉजिस्टिक कंपन्या तसेच वाहतूक सेवा व्यवस्थापन आणि बड्या कंपन्यांना मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल, असा विश्वास एनपीएसटीचे संचालक आशिष अग्रवाल यांनी व्यक्त केला.
इन्फिनिटी इन्फोवे विविध शाळा, महाविद्यालये आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांना ईआरपी उपाययोजना प्रदान करते आणि त्यांच्या सेवेत २० लाखांहून अधिक विद्यार्थी आणि तीन लाख वाहन चालक नोंदणीकृत आहेत. जे या टाइमपे प्रीपेड कार्डचे संभाव्य ग्राहक आणि वापरकर्ते ठरू शकतील, असे इन्फिनिटी इन्फोवेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक भावेश गधेथरिया म्हणाले. त्यांच्या मते, हे कार्ड विद्यार्थ्यांचे चिप-आधारीत ओळखपत्र म्हणून कामी येईल. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी लहान वयातच क्यूआर कोडसमर्थित डिजिटल देयक व्यवहाराची सवय लागावी म्हणून पालक या प्रीपेड कार्डमध्ये निधी जमा (प्रीलोड) करू शकतील आणि त्यांच्या खर्चावर सुलभ देखरेखीसह कठोर नियंत्रणही ठेवू शकतील. तसेच हे कार्ड शाळा आणि विद्यार्थी व्यवस्थापनाच्या जसे शिक्षण शुल्क, पुस्तक व अन्य साहित्य खरेदी आदी मुख्य कार्यांनाही मदत करू शकते.
वाहतूक क्षेत्राच्या फायद्यांबाबत ते पुढे म्हणाले की, वाहतूकदार त्यांच्या ताफ्यातील चालकांसाठी या कार्डावर निधी प्रीलोड करू शकतात, जो क्यूआर कोड द्वारे देयक व्यवहार पूर्ण करण्यासाठी चालक वापरू शकतो.
डिजिटल व्यवहारांचे तपशील विनाविलंब उपलब्ध होत असल्याने त्यांच्या ताळमेळातून खर्च नियंत्रण आणि ऑडिट सज्जता सुधारली जाऊ शकते. तसेच चालकांसाठी सुरक्षित, कॅशलेस व्यवहारांना ते समर्थन देणारे ठरते. या कार्ड आधारीत मंचाचा इन्व्हेंटरी व्यवस्थापन, इंधन नियंत्रण आणि कर्मचारी व्यवस्थापनासह सर्व क्रियांना एकाच प्रणालीमध्ये एकत्रित करते, असेही ते म्हणाले.
एनपीएसटीने व्यवहारांच्या पूर्ततेसाठी एनएसडीएल पेमेंट बँकेसोबत करार केला आहे. ही प्रणाली देशभरात टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल, ज्याची सुरुवात निवडक शैक्षणिक संस्था आणि उद्योगांमध्ये नियंत्रित अंमलबजावणीने होईल. त्यानंतर भागीदारांच्या गरजा आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित व्यापक विस्तार केला जाईल, असे भावेश गधेथरिया यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, इन्फिनिटीच्या मजबूत क्षमता आणि शिक्षण क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीमुळे कंपनीला नवीन टप्पे गाठता येतील आणि विद्यार्थी, पालक व शिक्षण व्यवस्थापनाला अधिक मूल्य प्रदान करता येईल.

