मुंबईः हिरे उत्पादनांतील जागतिक आघाडीचा समूह डी बीयर्स ग्रुप आणि टाटा समूहातील टायटन या कंपनीची दागिने विक्री नाममुद्रा तनिष्कने बुधवारी नैसर्गिक हिऱ्यांच्या विक्री आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मौल्यवान खड्यांसाठी भारतीय बाजारपेठेत वाढीचे उद्दिष्ट ठेवून दीर्घकालीन सहकार्याची घोषणा केली.
भारतीय ग्राहकांकडून नैसर्गिक हिऱ्याच्या दागिन्यांची मागणी अलीकडे वाढली असून, तिचा जागतिक मागणीत सध्या ११ टक्के वाटा आहे. या अंगाने भारत ही नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांची जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनून तिने चीनची जागा घेतली आहे. तथापि, भारतातील हिऱ्यांच्या मालकीचे प्रमाण हे अमेरिकेसारख्या परिपक्व बाजारपेठेपेक्षा खूपच कमी असून, हीच वाढीला चालना देणारी महत्त्वपूर्ण संधी असल्याचे उभय कंपन्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>> जागतिक सकारात्मकतेने निर्देशांक तेजी कायम, ‘सेन्सेक्स’ ८२,३६५ च्या विक्रमी शिखरावर
वर्षाला सुमारे ३५ लाख ग्राहकांना दागिन्यांची किरकोळ विक्री करणाऱ्या तनिष्कची अपेक्षा आहे की आगामी काळात नैसर्गिक हिरे जडलेल्या दागिन्यांचा ग्राहक सध्याच्या १० लाखांवरून सहज दुप्पट होईल, असा अंदाज टायटन कंपनी लिमिटेडच्या आभूषणे विभागाचे मुख्याधिकारी अजॉय चावला यांनी व्यक्त केला. या भागीदारीद्वारे ग्राहकांचे शिक्षण, त्यांचे स्वारस्य आणि आत्मविश्वास वाढवण्यावर आणि संपूर्ण भारतात नैसर्गिक हिऱ्यांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोच वाढविण्यासह, तनिष्कच्या कर्मचाऱ्यांच्या नैसर्गिक हिऱ्यांबद्दल संवाद साधण्याची क्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. डी बियर्स ब्रँड्सचे मुख्याधिकारी सँड्रिन कॉन्सिलर म्हणाले, डी बिअर्सप्रमाणेच तनिष्कदेखील नैसर्गिक हिऱ्यांची शक्ती, मौल्यवानता आणि प्रतिष्ठा पुरेपूर ओळखते, शिवाय भारतीय बाजारपेठेबद्दल त्यांची सखोल समज आणि आमच्या हिऱ्यांच्या क्षेत्रातील विशेषज्ज्ञता या भागीदारीतून अपेक्षित परिणाम दाखवून देईल.