पुणे : टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्स लिमिटेडने ‘इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह कम्पोनंट्स ग्रुप स्वीडन एबी’चे (आयएसी स्वीडन) अधिग्रहण पूर्ण केले आहे. आयएसी स्वीडनची वार्षिक उलाढाल अंदाजे ८० कोटी डॉलर (सुमारे ७ हजार २०० कोटी रुपये) आहे. टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्स ग्रुप अंतर्गत ही नवीन कंपनी आता आर्टिफेक्स सिस्टीम्स एबी म्हणून काम करेल.
याबाबत टाटा ऑटोकॉम्पने म्हटले आहे की, या अधिग्रहणाच्या पूर्णतेमुळे टाटा ऑटोकॉम्पची युरोपमधील बाजारपेठेत उपस्थिती बळकट होईल. यामुळे टाटा ऑटोकॉम्पची युरोपमधील प्रवासी आणि व्यावसायिक वाहन निर्मिती क्षेत्रातील वाहन निर्मिती कंपन्यांशी भागीदारी अधिक दृढ होईल. टाटा ऑटोकॉम्पच्या जागतिक स्तरावरील विस्तार धोरणात हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. यामुळे वाहनांचे सुटे भाग बनविणाऱ्या आणि वैविध्यपूर्ण उत्पादनांची मालिका असलेल्या टाटा ऑटोकॉम्पचे आघाडीचे स्थान मजबूत होणार आहे.
याबाबत टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्सचे उपाध्यक्ष अरविंद गोयल म्हणाले की, आयएसी स्वीडन आता आर्टिफेक्स सिस्टीम्स एबी बनली आहे. त्यांचे टाटा ऑटोकॉम्प कुटुंबात स्वागत करताना आम्हाला आनंद आहे. हा व्यवहार जागतिक पातळीवरील कंपनीच्या उपस्थितीला बळकटी देणारा आहे. तसेच युरोपमधील वाहन निर्मिती कंपन्यांसोबत संबंध अधिक दृढ करण्याच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
वाहन उद्योगासाठी उच्च-गुणवत्तेचे अंतर्गत आणि बाह्य उपाय प्रदान करण्याचा त्यांचा समृद्ध वारसा आहे. आता एकत्रितपणे या मजबूत पायावर उभारणी करण्याचा आमचा मानस आहे. आर्टिफेक्स सिस्टीम्स एबी, आर्टिफेक्स स्लोव्हाकिया आणि आर्टिफेक्स इंटिरियर सिस्टीम्सना एकत्र आणून आर्टिफेक्स ब्रँड अधिक सक्षम करण्याची आमची योजना आहे.
