पुणे : टाटा मोटर्सने ‘टाटा एस प्रो’ या मिनीट्रकचे सोमवारी अनावरण केले. पेट्रोल, बायो-फ्युएल आणि आणि इलेक्ट्रिक अशा विविध इंधन पर्यायांमध्ये ‘एस प्रो’ उपलब्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व नागपूर अशी प्रमुख शहरांमध्ये ई-कॉमर्स मंचासह वस्तू वितरणाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. अशा क्षेत्रांमध्ये ‘एस प्रो ईव्ही’ मिनीट्रक अनुकूल ठरेल, असे टाटा मोटर्सच्या वाणिज्य वाहन विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख पिनाकी हल्दर म्हणाले.
कोकण, विदर्भ व मराठावाड्यात कृषी-आधारित उद्योग आणि सूक्ष्म तसेच लघुउद्योगांची परिसंस्था आहे. तिथे उच्च वहन क्षमता, सुसंगत आकारमान, इंधन कार्यक्षमता, अरूंद रस्त्यांमधून वाहतूक अशा वैशिष्टांमुळे ‘एस प्रो’ महत्त्वाची भूमिका बजावेल. हल्दर म्हणाले, ‘एस प्रो’ची किंमत आम्ही तीनचाकी वाणिज्य वाहनांसारखी ठेवली आहे. यामुळे तीनचाकीऐवजी ग्राहक ‘एस प्रो’सारख्या चारचाकी वाहनाचा पर्याय निवडतील.
यावेळी टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले, ‘टाटा एस’ने गेल्या दोन दशकांमध्ये २५ लाखांहून अधिक स्वयंउद्योजकांना सक्षम केले आहे. नवीन ‘टाटा एस प्रो’ आम्ही महत्त्वाकांक्षी भावी पिढीसाठी आणला आहे. यात उच्चतम सुरक्षा वैशिष्टे देण्यात आली आहेत. ‘एस प्रो’मध्ये व्यावसायिकांना जास्त उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता आहे. देशातील महत्त्वाकांक्षी स्वयंउद्योजकांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यास ‘एस प्रो’ मदत करेल.