मुंबई : टाटा समूहातील आघाडीची कंपनी असलेल्या टायटनने प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने शुक्रवारी बीयॉन या नाममुद्रेअंतर्गत प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांच्या (लॅब-ग्रोन डायमंड) विभागात प्रवेशाची घोषणा केल्याचे शेअर बाजारांना विधिवत कळविले.
देशातील प्रयोगशाळेत तयार केलेल्या आणि परवडणाऱ्या हिऱ्यांच्या उदयोन्मुख व्यवसाय विभागावर लक्ष केंद्रित करून, येत्या २९ डिसेंबरला मुंबईत दालन सुरू केले जाणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली. टायटनची ‘बीयॉन – फ्रॉम द हाऊस ऑफ टायटन’ ही नाममुद्रा, घड्याळे, परफ्यूम, साड्या आणि हँडबॅग्ज व्यतिरिक्त जीवनशैलीच्या श्रेणींमध्ये महिलांच्या अलंकाराच्या गरजा देखील पूर्ण करणार आहे.
बीयॉन प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांची एक निवडक श्रेणी सादर करेल आणि या उदयोन्मुख श्रेणीत सुरुवात करेल. तसेच नजीकच्या भविष्यात मुंबई आणि दिल्लीमध्ये आणखी काही दालने जोडण्याची योजना आहे, असे टायटनकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या दोन- तीन वर्षांत, नैसर्गिक हिऱ्यांना परवडणारे, शाश्वत आणि नैतिकदृष्ट्या दिला गेलेला पर्याय म्हणून आणि ग्राहकांच्या वाढत्या स्वीकृतीमुळे भारतातील प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांच्या बाजारपेठेत वेगाने वाढ झाली आहे.
भारतीय दागिन्यांच्या बाजारपेठेत हिऱ्यांचा वाटा अजूनही १० टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि त्यात वाढीसाठी मोठी संधी आहे, असे वझीर ॲडव्हायझर्स या सल्लागार संस्थेने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत, जडजवाहीर असलेले दागिने अधिक लोकप्रिय होत आहेत आणि उच्च नफ्यामुळे संघटित किरकोळ विक्रेते यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.
नैसर्गिक हिऱ्यांच्या किमतींवर ताण शक्य
नैसर्गिक हिऱ्यांच्या तुलनेत लॅब-ग्रोन हिरे हे ७० टक्के ते ८० टक्के स्वस्त असतात. या क्षेत्रात टायटनसारख्या बड्या नाममुद्रेने प्रवेश करणे हा भारतीय हिरे बाजारपेठेसाठी एक ‘गेम चेंजर’ क्षण मानला जात आहे. मध्यमवर्गीय हिऱ्यांची ऐश्वर्य आवाक्यात आणणारे म्हणून लॅब-ग्रोन हिऱ्यांकडे पाहिले जाते.
उदाहरण: १ कॅरेटचा नैसर्गिक हिरा ४-५ लाख रुपयांना मिळत असेल, तर तसाच लॅब-ग्रोन हिरा ६०,००० ते ८०,००० रुपयांत मिळू शकतो. टायटनच्या प्रवेशामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांनाही मोठ्या हिऱ्यांचे दागिने खरेदी करणे शक्य होईल, ज्यामुळे बाजारपेठेचा विस्तार होईल. शिवाय टायटनच्या या क्षेत्रातील प्रवेशामुळे नैसर्गिक हिऱ्यांच्या मागणीवर आणि त्यांच्या किमतीवर परिणाम संभवतो, असा बाजार तज्ज्ञांचा कयास आहे.
भारतातील हिरे बाजारपेठ
भारतीय हिऱ्यांच्या दागिन्यांची बाजारपेठ २०२५ मध्ये सुमारे ६.२ अब्ज डॉलर अर्थात ५५,६७४.५४ कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज आहे आणि २०२८ पर्यंत ती वार्षिक सरासरी १२ टक्के दराने वाढून ८.६ अब्ज डॉलर म्हणजेच ७७,२२५.९७ कोटी रुपयांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. भारत नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी जगातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे.
