मुंबई: भारतातील खासगी क्षेत्रातील अव्वल ५०० कंपन्यांचे बाजार भांडवल २०२४ मध्ये ३२४ लाख कोटी म्हणजेच ३.८ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे, जे देशाच्या २०२३च्या सकल देशांतर्गत उत्पादनापेक्षा (जीडीपी) अधिक आहे. त्यावेळी देशाचा जीडीपी ३.५ ट्रिलियन डॉलर राहिला होता, असे ॲक्सिस बँकेच्या बरगंडी प्रायव्हेट आणि हुरुन इंडियाच्या अहवालाने मंगळवारी स्पष्ट केले.भारतातील या ५०० कंपन्यांचे बाजार भांडवल हे संयुक्त अरब अमिराती (यूएई), इंडोनेशिया आणि स्पेन या देशांच्या एकत्रित जीडीपीपेक्षा जास्त आहे. या कंपन्या देशाच्या खासगी क्षेत्राचा ‘कणा’ समजल्या जातात, ज्यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय योगदान आहे. शिवाय देशातील सुमारे ८.४ कोटी लोकांना त्या रोजगार पुरवितात, असे हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले.
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे, जिचे बाजार मूल्य १२ टक्क्यांनी वाढून १७.५ लाख कोटी रुपयांच्या घरात गेले आहे. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा क्रमांक लागतो, जिचे बाजार मूल्य ३० टक्क्यांनी वधारून १६.१ लाख कोटी रुपये झाले आहे आणि त्यापाठोपाठ खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचा क्रमांक लागतो, जिचे मूल्य २६ टक्क्यांनी वाढून १४.२ लाख कोटी रुपये झाले आहे.वर्ष २०२४ च्या बरगंडी प्रायव्हेट हुरून इंडिया ५०० यादीनुसार, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस ही सर्वात वेगाने वाढणारी कंपनी म्हणून पुढे आली. जिचे मूल्य वर्षभरात २९७ टक्क्यांनी वाढले आहे, त्यानंतर आयनॉक्स विंड आणि झेप्टो यांचा क्रमांक लागतो, या दोन्ही कंपन्यांनी वर्षभरात त्यांचे मूल्यांकन जवळजवळ तिप्पट केले. या यादीत सरकारी मालकीच्या उद्योगांचा समावेश नाही, त्यामुळे भारतातील सर्वात मौल्यवान सरकारी मालकीची सूचिबद्ध कंपनी, स्टेट बँकेचा या यादीत समावेश नाही. तिचे बाजार भांडवल ७.७ लाख कोटींहून अधिक आहे. तसेच शंभरहून अधिक सरकारी मालकीच्या कंपन्या या यादीत येऊ शकल्या असता, त्यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी), एनटीपीसी, ओएनजीसी या कंपन्यांचा समावेश झाला असता. खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेलने पहिल्यांदाच ९.७४ लाख कोटी बाजारभांडवलाचा टप्पा ओलांडला आहे.
‘एनएसई’ची १० व्या क्रमांकावर मुसंडीप्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) करू इच्छिणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराचे अर्थात ‘एनएसई’ या आघाडीच्या बाजारमंचाचे मूल्यांकन २०२४ मध्ये २०१ टक्क्यांनी वाढून ४.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, असे हुरुन इंडियाने म्हटले आहे. देशातील आघाडीचा बाजार मंच असलेली ‘एनएसई’ ही आधीच देशातील १० व्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान खासगी क्षेत्रातील कंपनी आहे. सप्टेंबर २०२४ च्या अहवालानुसार, तिचे मूल्यांकन ३.१२ लाख कोटी रुपये होते. एका वृत्तानुसार, जगातील सर्वात मोठा डेरिव्हेटिव्ह अर्थात वायदे बाजार मंच असलेल्या ‘एनएसई’कडून आयपीओच्या माध्यमातून १० टक्के हिस्सा विक्रीचे उद्दिष्ट आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एकूण महसूल २८ टक्क्यांनी वाढून १६,३५२ कोटी रुपये झाला आणि करोत्तर नफा ५१ टक्क्यांनी वाढून ८,३०६ कोटी रुपये झाला.