रिझर्व्ह बँकेने सलग सातव्या आणि नवीन आर्थिक वर्षातील पहिल्या पतधोरण बैठकीत, ‘रेपो दर’ ६.५ टक्क्यांवर शुक्रवारी स्थिर ठेवले. परिणामी बँकांच्या कर्जाचे व्याजदर तसेच गृह कर्ज, वाहन कर्ज तसेच शैक्षणिक कर्जाच्या हप्त्यांमध्ये सर्वसामान्यांना तूर्त कोणताही दिलासा मिळणार नाही. अन्नधान्य महागाई आणि उन्हाळ्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज याबद्दलही मध्यवर्ती बँकेने चिंता व्यक्त केली आहे.

रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी २०२३ पासून दर दोन महिन्यांनी होणाऱ्या पतधोरण आढाव्याच्या बैठकीत व्याजदरात कोणतेही फेरबदल केलेले नाहीत. मंगळवार ते शुक्रवार असे तीन दिवस चाललेल्या पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) बैठकीतही सहा सदस्यांपैकी पाच जणांनी रेपो दर आहे त्या पातळीवर स्थिर ठेवण्याच्या बाजूने, तर एकाने विरोधात कौल दिला. मध्यवर्ती बँकेने २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्था वाढीचा दर आणि किरकोळ महागाई दरासंबंधी अनुक्रमे ७ टक्के व ४.५ टक्क्यांचा अनुमानही कायम ठेवला आहे.

हेही वाचा >>>ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप

याबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, सूक्ष्मआर्थिक आणि वित्तीय घडामोडींचे मूल्यमापन करून पतधोरण समितीने बहुमताने जैसे थे धोरण ठेवण्याचा निर्णय घेतला. महागाई नियंत्रणात आणण्यावर सर्व सदस्यांनी एकमत दर्शविले. तथापि महागाई उद्दिष्टापर्यंत खाली आणतानाच, विकास दराच्या वाढीला प्राधान्य दिले जाणार आहे.

महागाई आणि ‘हत्ती’चे रूपक!

अन्नधान्य महागाईबाबत चिंता व्यक्त करून गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, जेव्हा एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ७.८ टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता, तेव्हा खोलीची जागा व्यापणारा हत्ती अर्थात महागाई ही सर्वात मोठी डोकेदुखी होती. ते म्हणाले, ‘तेव्हा घरातला हत्ती म्हणजे डोईजड किरकोळ महागाई दर होता. हत्ती आता घराबाहेर निघून फिरायला निघाला आहे, आणि जंगलात परतताना दिसतोय. त्याचा स्थायीरूपात जंगलात वावर राहिल, हे पाहिले जाईल.’ हे जोवर साध्य होत नाही तोपर्यंत आपले कार्य अपूर्णच राहते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. अन्नधान्याच्या किमतीतील अनिश्चिततेमुळे महागाई चढत जाण्याची जोखीम आहे. डाळी आणि महत्त्वाच्या भाज्यांची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज असल्याने हे गरजेचे बनले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उष्णतेची लाट मार्चपासूनच सुरू झाली आहे. गव्हाची काढणी बऱ्यापैकी संपत आल्याने त्याबाबतीत फारशी काळजी करण्याची आवश्यकता नाही. भाज्यांच्या उत्पादनावर उष्णतेच्या लाटेचा होणारा परिणाम मात्र बारकाईने पाहावा लागेल.- शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक