लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि अमेरिकेतील महाकाय वित्तीय समूह ब्लॅकरॉक यांच्यातील समान भागीदारीतील संयुक्त उपक्रम असलेल्या ‘जिओ ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ला भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने मंगळवारी मालमत्ता व्यवस्थापक म्हणून कामकाज सुरू करण्यासाठी मान्यता दिली. या नियामक मंजुरीने आता या कंपनीला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करता येणार आहे.

सेबीने २६ मे २०२५ रोजीच्या पत्राद्वारे ‘जिओ ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडा’ला नोंदणी प्रमाणपत्र आणि जिओ ब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडला मालमत्ता व्यवस्थापन कंपनी म्हणून काम करण्यास मान्यता दिली. जिओ फायनान्शियल आणि ब्लॅकरॉक फायनान्शियल मॅनेजमेंट इन्कने म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी सेबीकडे १९ ऑक्टोबर २०२३ रोजी कागदपत्रे दाखल केली होती. तर २९ ऑक्टोबर २०२४ रोजी जिओ ब्लॅकरॉक एएमसी या कंपनीच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती.

ब्लॅकरॉकसोबतची भागीदारी ही जागतिक गुंतवणूक कौशल्य आणि जिओच्या डिजिटल-फर्स्ट नाविन्यतेचे एक शक्तिशाली संयोजन ठरेल, असा विश्वास जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या बिगर कार्यकारी संचालिका ईशा अंबानी प्रसिद्धी निवेदनांत म्हटले आहे. प्रत्येक भारतीयासाठी गुंतवणूक सोपी, सुलभ आणि समावेशक बनवण्यासाठी कंपनी वचनबद्ध आहे आणि जिओ ब्लॅकरॉक एएमसी भारतातील आर्थिक सक्षमीकरणाच्या भविष्याला आकार देण्यात परिवर्तनकारी भूमिका बजावेल, असेही त्या म्हणाल्या. जिओ ब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंटने सीड स्वामिनाथन यांची कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीही त्यांनी घोषित केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्युच्युअल फंड व्यवसायाची वाट खुली झाल्याच्या वृत्ताचे मंगळवारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या समभाग मूल्यात सकारात्मक प्रतिबिंब उमटले. समभागाने पावणे चार टक्क्यांच्या मुसंडीसह २९१.४० रुपये या पातळीवर दिवसअखेरीस विश्राम घेतला.