आपण मेडिक्लेम पॉलिसी घेताना प्रामुख्याने ‘फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स’ आणि वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स घेत असतो. मात्र या पॉलिसीचा वार्षिक हप्ता (प्रीमियम) जास्त असल्याने घेण्यात येणारे विमा संरक्षण हे आवश्यकतेपेक्षा कमी घेतले जात असल्याचे दिसून येते. विशेषत: करोना महासाथीनंतर मेडिक्लेम पॉलिसीच्या प्रीमियममध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा अपुऱ्या विमा संरक्षणामुळे हेल्थ इन्शुरन्सचा अपेक्षित उद्देश साध्य होतोच असे नाही. विशेषत: वयाच्या ५०-५५ च्या पुढे आवश्यक तेवढे संरक्षण ‘फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स’ आणि वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्समार्फत घेणे फारच खर्चीक होते. यामुळे वाढत्या वयात आवश्यक ते विमा कवच घेतले जातेच असे नाही.
बहुतेक जण आपले सध्याच्या पॉलिसीचे केवळ नूतनीकरण करतात. वाढत्या वयात आहे त्याचा हप्तासुद्धा वाढलेला असतो. वाढत्या वयात आजारपण/शस्त्रक्रिया/ हॉस्पिटलायझेशनची शक्यता वाढलेली असते आणि नेमके याच वेळी आपल्याकडे असलेल्या पॉलिसीचा विमा हप्ता परवडत नसल्याने वाढविता येत नाही . मात्र या समस्येवर ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’ घेऊन मत करता येऊ शकते. तथापि बहुतेकांना याबबत फारशी माहिती नसल्याचे दिसून येते. म्हणून आपण इथे याबाबत माहिती घेऊ.
जनरल इन्शुरन्स कंपन्या आता हेल्थ इन्शुरन्सअंतर्गत ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’ देऊ करत आहेत. या पॉलिसीची अनेक वैशिष्ट्ये असून सामान्य माणसास परवडतील अशा प्रीमियममध्ये या पॉलिसी सहज घेता येतात. ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’ घेण्याआधी ‘फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी’ व ‘वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स’ घेणे सोयीस्कर असते मात्र घेतलीच पाहिजे असे नाही. विशेषत: आपण जर नोकरी करत असाल आणि आपल्याला कंपनीमार्फत समूह इन्शुरन्स पद्धतीने ‘मेडिक्लेम पॉलिसी’ कवच असेल तर या विमा संरक्षणाची ‘थ्रेशहोल्ड लिमिट’ असणारी ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’ घेणे फायदेशीर असते. त्यासाठी ‘टॉपअप मेडिक्लेम पॉलिसी’ नेमकी कसी असते हे आपण पाहू.
आपल्या असलेल्या ‘फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स’ किंवा वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स किंवा कंपनीकडून असणारे मेडिक्लेम कव्हर ही तुमची बेस (मूळ) पॉलिसी असते आणि या पॉलिसीतून मिळणाऱ्या कव्हरला ‘थ्रेशहोल्ड लिमिट’ असे म्हणतात. ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’तून मिळणारे विमा कवच हे ‘थ्रेश होल्ड लिमिट’च्या वर असते. उदा: आपल्या ‘फ्लोटर पॉलिसी’ कवच ३ लाख रुपये आहे आणि आपण जर ३ लाख रुपये ‘थ्रेशहोल्ड लिमिट’ असणरी १० लाख कव्हरची ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’ घेतली असेल आणि हॉस्पिटलचा खर्च पॉलिसी कालावधीत ८ लाख झाला असेल तर यातील ३ लाखांपर्यंतचा दावा (क्लेम) बेस पॉलिसीतून म्हणजेच आपल्या फ्लोटर पॉलिसीतून मिळेल व उर्वरित ५ लाखांचा दावा आपल्या टॉप मेडिक्लेम पॉलिसीतून मिळेल. मात्र आपला खर्च जर २.५ लाख झाला असेल. (या उदाहरणातील ‘थ्रेशहोल्ड लिमिट’च्या कमी झाला असेल) तर ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसीतून क्लेम’ मिळणार नाही. थोडक्यात ‘थ्रेशहोल्ड लिमिट’पेक्षा जास्त खर्च झाला तरच वरील रकमेसाठी ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’तून दावा मिळू शकतो.
याउलट आपला वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स असेल व पती/पत्नी प्रत्येकाचे कव्हर ३ लाख रुपये इतके असेल आणि आपण ३ लाख रुपये ‘थ्रेश होल्ड लिमिट’ असणारी ५ लाख कव्हर असणरी ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’ घेतली असल्यास पॉलिसी कालावधीत झालेला प्रत्येकाचा ३ लाखांपर्यंतचा खर्चाचा दावा वैयक्तिक ‘हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी’तून मिळेल व त्यावरीलर ५ लाखपर्यंतचा खर्च ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’तून मिळेल. जर आपल्याला कंपनीने आपल्या कुटुंबास ‘मेडिक्लेम कव्हर’ दिले असेल आणि ते ‘कव्हर थ्रेशहोल्ड लिमिट’ असणारी ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’ आपण घेतली असल्यास पॉलिसी कालावधीत होणारा एकूण दवाखान्याचा खर्च जर कंपनीने दिलेल्या विमा संरक्षणापेक्षा जास्त झाला असेल तर कंपनी विमा संरक्षणातून इतकी रक्कम ‘क्लेम’ म्हणून कंपनीच्या पॉलिसीतून मिळेल व त्यावरील रक्कम जास्तीत जास्त ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’च्या कव्हरइतकी मिळेल. उदा, आपले कुटुंबासाठीचे कंपनी कव्हर ३ लाख आहे व आपला हॉस्पिटलचा खर्च ७ लाख झाला आहे व आपले ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी कव्हर ५ लाख आहे तर आपल्याला कंपनी कव्हरमधून ३ लाख इतका तर ४ लाख इतका ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’तून मिळेल, असा एकूण ७ लाख इतका ‘क्लेम’ मिळू शकेल.
विशेष म्हणजे आपण बेस पॉलिसी (फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स किंवा वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स) न घेतासुद्धा ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’ घेऊ शकता, मात्र अशी पॉलिसी घेताना आपण जी ‘थ्रेशहोल्ड लिमिट’ घेतली असेल तेवढ्या रकमेपर्यंतचा ‘क्लेम’ मिळत नाही त्यावरील रकमेचा ‘क्लेम टॉप मेडिक्लेम पॉलिसी’तून मिळू शकतो. उदा, आपल्याकडे बेस पॉलिसी (फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स किंवा वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स) नाही. मात्र २ लाख ‘थ्रेश होल्ड लिमिट’ असणारी ५ लाख कव्हर असणारी ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसी’ घेतली असेल आणि पॉलिसी कालावधीत आपला दवाखान्याचा खर्च ३ लाख झाला तर आपल्याला केवळ १ लाख इतकाच क्लेम मिळेल आणि आपला खर्च १ लाख इतका झाला तर खर्च ‘थ्रेशहोल्ड लिमिट’च्या आत असल्याने काहीही क्लेम मिळणार नाही.
त्यांनी ‘टॉपअप पॉलिसी’ क्लेम थ्रेशहोल्ड लिमिट संपली तरच ‘ट्रिगर’ होतो, त्यामुळे क्लेमची शक्यता ‘फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स’ किंवा वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स यांच्या क्लेमच्या शक्यतेपेक्षा कमी असल्याने प्रीमियम कमी असतो, याशिवाय जेवढी ‘थ्रेशहोल्ड लिमिट’ जास्त तेवढा प्रीमियम कमी असल्याने पॉलिसी घेणे परवडते. एक परिवार एक पॉलिसी या कौटुंबिक तत्त्वाचा आधार घेऊन एकाच पॉलिसीतून कुटुंबातील सर्व सदस्यांना ‘टॉप मेडिक्लेम पॉलिसीतून ‘मेडिक्लेम’चा फायदा मिळू शकतो. कुटुंब म्हणजे पती/पत्नी व अवलंबून असणारी मुले. ही पॉलिसी १८ ते ८० वयाच्या व्यक्तीस घेता येते. तसेच आई/वडील पॉलिसी घेत असतील तर ३ महिन्यांच्या मुळापासून ते १८ वर्षांच्या पर्यंतच्या मुलांचा समावेश करता येतो. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असले आणि जर मुलांचे उच्च शिक्षण चालू असल्यास २६ वर्षे वयापर्यंत समावेश करता येतो. दिव्यांग मुलांसाठी वयाची अट नाही.
ज्या कंपनीची बेस पॉलिसी (फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स किंवा वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स) त्याच कंपनीची ‘टॉपअप पॉलिसी’ घेणे सोयीचे असते. कारण एकाच ठिकाणी क्लेम दाखल करता येतो. मात्र त्याच कंपनीची टॉपअप पॉलिसी न घेता दुसऱ्या कंपनीचीसुद्धा घेते येते. मात्र अशा वेळी बेस पॉलिसीचा आणि ‘टॉपअप पॉलिसी’चा वेगळा ‘क्लेम’ दाखल करावा लागतो. दोन्ही पॉलिसी एकाच वेळी घेतल्या पाहिजेत असे नाही. मात्र जो ‘क्लेम’ दाखल करावयाचा ती ‘पॉलिसी इन फोर्स’ असणे जरुरीचे असते. (पॉलिसी मुदत संपलेली नसावी.)
‘टॉपअप पॉलिसीचे टॉपअप आणि सुपर टॉपअप असे दोन प्रकार आहेत, या दोन्ही पॉलिसी सारख्याच असल्या तरी सुपर टॉपअप पॉलिसी घेणे जास्त फायदेशीर असते. कारण सुपर टॉपअप पॉलिसीचा ‘मल्टिपल क्लेम’ मिळू शकतो. तसा सध्या ‘टॉपअप पॉलिसी’त मिळू शकत नाही. उदा, परब यांची ५ लाख विमा कवच असणरी बेस पॉलिसी असून १० लाख कव्हर असणरी ‘टॉपअप पॉलिसी’ आहे. जर हॉस्पिटलचा खर्च ७ लाख झाला तर त्यांना बेस पॉलिसीतून ५ लाखांचा ‘क्लेम’ मिळेल तर उर्वरित २ लाखांचा ‘क्लेम’ टॉपअपमधून मिळेल. मात्र जर त्यांना एकाच वर्षात दोनदा हॉस्पिटलमध्ये जावे लागले आणि प्रत्येक वेळी ४ लाख आणि ३ लाख इतका खर्च आला तर ‘बेस पॉलिसी’तून केवळ ५ लाख इतका ‘क्लेम’ मिळेल. प्रत्येक वेळचा खर्च ५ लाखांपेक्षा कमी असल्याने ‘टॉपअप पॉलिसी’तून ‘क्लेम’ मिळणार नाही. कारण दोन्हीही वेळी झालेला खर्च ५ लाखांपेक्षा (थ्रेशहोल्ड लिमिट) कमी होता. मात्र जर त्यांनी ‘सुपर टॉपअप पॉलिसी’ घेतली असेल तर ‘मल्टिपल क्लेम’ स्वीकारले जाऊन दोन्ही क्लेमची रक्कम ‘थ्रेशहोल्ड लिमिट’पेक्षा जास्त असल्याने ५ लाखांचा ‘क्लेम बेस पॉलिसी’तून तर २ लाखांचा ‘क्लेम सुपर टॉपअप पॉलिसी’तून दिला जाईल. थोडक्यात, असे महता येईल की, वयाच्या ५०-५५ नंतर आपल्या ‘फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स’ किंवा वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे विमा कवच न वाढविता ते ‘थ्रेशहोल्ड लिमिट’ ठेवून ५ ते १० लाखांचे कवच असणारी ‘सुपर टॉपअप पॉलिसी’ घेतल्यावर विमा कवचही वाढेल आणि हप्ता कमी द्यावा लागेल. लेखक पुणेस्थित सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर(सीएफपी) आहेत.