पीटीआय, नवी दिल्ली
निर्यात आणि आयातीशी निगडित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी केंद्र सरकारने बुधवारी ‘ट्रेड कनेक्ट’ या ऑनलाइन मंचाचे अनावरण केले. या मंचाच्या माध्यमातून सध्या कार्यरत असणारे आणि नवीन स्वयंउद्योजकांनाही मदत होणार आहे.
‘ट्रेड कनेक्ट’ हे संकेतस्थळ मंच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, एक्झिम बँक, टीसीएस, वित्तीय सेवा सचिव आणि परराष्ट्र मंत्रालय यांनी एकत्रितपणे विकसित केले आहे. संकेतस्थळाचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, सीमा शुल्क, नियम आणि नियमावली अशी वेगवेवगळ्या प्रकाराची माहिती या मंचावर मिळेल. निर्यातदारांना योग्य माहिती मिळावी हा यामागील उद्देश आहे. त्यातून त्यांना पाठबळ मिळण्यास मदत होईल.
हेही वाचा – सेबी अध्यक्षांवर नव्याने आरोप;प्रतिसादशून्य मौनावरही ‘हिंडेनबर्ग’कडून प्रश्न
याबाबत परकीय व्यापार महासंचालक (डीजीएफटी) संतोष कुमार सरंगी म्हणाले की, व्यापाराशी निगडित गुंतागुंतीची आणि आवश्यक माहिती तत्काळ निर्यातदारांना या मंचाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल. याचबरोबर निर्यातदारांना भारताचे परदेशातील वाणिज्य दूतावास, वाणिज्य विभाग, निर्यात प्रोत्साहन परिषद आणि इतर व्यापार तज्ज्ञांशी जोडण्यात येईल. नवीन आणि जुन्या अशा सर्व निर्यातदारांना साहाय्य मिळावे, अशा पद्धतीने या मंचाची रचना करण्यात आली आहे.