मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या यूको बँकेने डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत ६३८.८३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, जो मागील वर्षीच्या तिमाहीतील ५०२.८३ कोटी रुपये नोंदवला गेला होता. त्यात २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. व्याज उत्पन्नातील वाढीमुळे बँकेच्या नफ्यात भरीव वाढ झाली आहे.

बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर १,९८८ कोटींवरून १९.६ टक्क्यांनी वधारून २,३७७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तरतुदीपूर्व बँकेचा कार्यकारी नफा ४१.७ टक्क्यांनी वधारला आहे. तो १,११९.१४ कोटी रुपयांवरून १,५८५.६९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याबरोबरच सरलेल्या तिमाहीत बँकेचे एकूण अनुत्पादक मालमत्ता ३.३७ टक्क्यांनी कमी होऊन ६,२९३.८६ कोटींवर मर्यादित आहेत. डिसेंबर तिमाहीत निव्वळ बुडीत कर्ज अनुक्रमे ८.७६ टक्क्यांनी घसरून १,४०६.४४ कोटींवरून १,२८३.१३ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. ३१ डिसेंबर २०२४ अखेर यूको बँकेची व्यावसायिक उलाढाल ४,८८,९११ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, ज्यात वार्षिक १२.२८ टक्के वाढ झाली आहे.

Story img Loader