एपी, संयुक्त राष्ट्रे

गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने सोमवारी युद्धविरामाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला. सुरक्षा परिषदेच्या १५ पैकी १४ सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला, तर रशिया मतदानाच्या वेळी गैरहजर राहिला. इस्रायल आणि हमासने कोणत्याही विलंबाविना आणि कोणत्याही शर्तीविना युद्ध तात्काळ थांबवावे असे या प्रस्तावात म्हटले आहे.

हेही वाचा >>> कन्नड अभिनेता दर्शनला हत्येप्रकरणी अटक; बंगळूरु पोलिसांच्या कारवाईनंतर सहा दिवसांची पोलीस कोठडी

हे युद्ध गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असून त्यामध्ये आतापर्यंत ३५ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा आणि १२०० पेक्षा जास्त इस्रायलींचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या पुढाकाराने सुरक्षा परिषदेत हा प्रस्ताव मांडण्यात आला असून तो इस्रायलला मान्य असल्याचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले आहे. युद्धविराम तीन टप्प्यांमध्ये राबवावा असा प्रस्ताव असून हमासनेही तो स्वीकारावा असे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, इस्रायल आणि हमास युद्धविरामाचा प्रस्ताव मान्य करतात का याबद्दल साशंकता आहे. यापूर्वीही संयुक्त राष्ट्रांनी युद्धविरामाचा प्रस्ताव मंजूर केला होता, तो इस्रायल व हमासने मान्य केला नव्हता. मात्र, सुरक्षा परिषदेसारख्या अधिक शक्तिशाली संघटनेनेही हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे आता त्यांच्यावर अधिक दबाव टाकता येईल अशी अपेक्षा आहे.