scorecardresearch

एप्रिलपासून वाहने महागणार; मारुती सुझुकीसह अनेक कंपन्यांकडून किंमतीत वाढ

एप्रिलपासून चारचाकी, दुचाकी प्रवासी वाहनांसह, वाणिज्य वापराच्या वाहनांच्या किमतीही वाढलेल्या दिसून येतील.

maruti suzuki
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: देशात सर्वाधिक वाहने विकल्या जाणाऱ्या मारुती सुझुकीसह, बहुतांश वाहन निर्मात्या कंपन्यांनी, उत्पादन खर्च वाढल्याने किमतीत वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून चारचाकी, दुचाकी प्रवासी वाहनांसह, वाणिज्य वापराच्या वाहनांच्या किमतीही वाढलेल्या दिसून येतील. मारुती सुझुकीने गुरुवारी भांडवली बाजाराला दिलेल्या माहितीप्रमाणे, सर्वच पातळ्यांवर वाढलेली महागाई आणि नियमानुसार आवश्यक गोष्टींचा अंतर्भाव करावा लागत असल्यामुळे कंपनीवर किमतीचा दबाव वाढत असल्याचे म्हटले आहे. वाढता खर्च कमी करून किंमत न वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू होता. परंतु, आता खर्चातील वाढीमुळे याचा काही प्रमाणात परिणाम ग्राहकांवर होणार आहे. कंपनीकडून किमतीत एप्रिलपासून वाढ करण्यात येणार असून, ही वाढ मोटारींच्या मॉडेलनुसार वेगवेगळी असेल.

वाहन उत्पादक कंपन्यांवर मागील काही काळापासून सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतीचा दबाव आहे. याचबरोबर देशात पुढील महिन्यापासून ‘भारत स्टेज ६’ श्रेणीतील वाहनांच्या निर्मितीची अंमलबजावणी सुरू होत आहे. यामुळे वाहन उत्पादन कंपन्यांना या श्रेणीच्या नियमांनुसार वाहनांचे उत्पादन करावे लागणारे आहे. त्यांना वाहनांमध्ये प्रदूषण तपासणी करणारे उपकरण बसवावे लागणार असून, त्यामुळेही त्यांच्या खर्चात वाढ होणार आहे.

किमती वाढवणाऱ्या कंपन्या

-हिरो मोटोकॉर्पकडून दुचाकी आणि स्कूटरच्या काही मॉडेलच्या किमतीत १ एप्रिलपासून २ टक्के वाढ होणार

-टाटा मोटर्सकडून वाणिज्य वाहनांच्या किमतीत ५ टक्के वाढ केली जाणार असून, ही चार महिन्यांतील दुसरी वाढ

-मारुती सुझुकीकडून १ एप्रिलपासून सर्व मोटारींच्या किमतीत मॉडेलनुसार वेगवेगळी वाढ होणार

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 11:33 IST

संबंधित बातम्या