Adar Poonawalla Net Worth : करोनाविरोधातील लस निर्मिती करून अदर सीरम इन्स्ट्यिट्युटने नवा इतिहास रचला होता. आता याच कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी बॉलिवूडच्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसबरोबर मोठा करार केला आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये अदर पूनावाला यांनी ५० टक्के भागिदारी केली आहे. बॉलिवूडमधील हे मोठं डील मानलं जात आहे. भारतातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत असलेल्या अदर पूनावाला यांच्यासाठीही हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, अदर पूनावाला नक्की कोण, त्यांची संपत्ती किती हे जाणून घेऊयात.
प्रतिष्ठित पूनावाला कुटुंबात जन्माला आलेल्या अदर पूनावाला यांनी पुण्यातून शालेय शिक्षण घेतलं. द बिशप स्कूल, त्यानंतर कँटरबरी येथील प्रतिष्ठित सेंट एडमंड स्कूल आणि नंतर वेस्टमिन्स्टर विद्यापीठात शिक्षण घेतलं. लंडनमध्ये असताना बायोटेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा पुण्यात परतले.
२०११ मध्ये अदर पूनावाला यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पद स्वीकारलं. तो निर्णय सीरम इन्स्टिट्यूटसाठी टर्निंग पॉइंट ठरला. विकसनशील देशांसाठी परवडणारी लस तयार करणे आणि जगभरातील रोगांचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपचार तयार करणे हा या कंपनीचा मुख्य उद्देश आहे. यामुळे सीरमचा विस्तार झाला. १७० पेक्षा जास्त देशांना या कंपनीने लस पुरवठा केला आहे.
हेही वाचा >> Adar Poonawalla : अदर पूनावाला आता चित्रपट निर्मितीत, करण जोहरच्या ‘धर्मा’बरोबर मोठं डील! कोण असेल सीईओ?
करोना काळात अदर पूनावाला यांचं उत्कृष्ट कार्य
२०२० पासून भारतासह जगभर करोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. दिवसेंदिवस करोनाचे असंख्य रुग्ण सापडत होते. करोना रुग्णांमध्ये वाढ होत गेल्याने जगभरातून चिंता व्यक्त केली जात होती. जागतिक आरोग्य संघटनेनेही वैद्यकीय आणीबाणी जाहीर केली. दरम्यान, संपूर्ण जग करोनाच्या दहशतीत असताना भारतातल्या सीरमने सर्वांत आधी करोनाविरोधात सक्षम लसची निर्मिती केली. जवळपास १७० हून अधिक देशांमध्ये सीरमची लस पोहोचली. या लसमुळे कंपनीची भरभराट झाली.
व्यवसायासह सामाजिक उपक्रमातही सहभागी
अदर पुनावाला यांच्या लस उत्पादनामुळे त्यांना ४० वर्षांखालील सर्वांत प्रभावशाली नेत्यांमध्ये स्थान मिळवले. व्यवसायाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अनेकविध उपक्रम हाती घेतले होते. त्यांची पत्नी नताशा पूनावाला यांच्यासह त्यांनी २०१२ मध्ये विल्लू पूनावाला चॅरिटेबल फाऊंडेशनची स्थापना केली होती. त्याअंतर्गत शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छ पाणी आणि पर्यावरणीय स्वच्छता यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या फाऊंडेशनअंतर्गत पुण्यात ८ शाळा चालवल्या जातात. या आठ शाळांमध्ये जवळपास १० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसंच, अदर पूनावाला यांच्याकडून रुग्णालयही चालवले जाते.
अदर पूनावाला यांचं नेट वर्थ किती?
फायनान्शिअल एक्स्प्रेसने जुलै २०२३ मध्ये दिलेल्या वृत्तानुसार अदर पूनावाला यांच्या कुटुंबीयांचं नेटवर्थ १३६ कोटी रुपये आहे. त्यांनी लंडनमध्ये सर्वांत महागडं घरही खरेदी केलं आहे. या घराची किंमत जवळपास १३८ डॉलर मिलिअन एवढी आहे. तसंच, मुंबई, पुणे आणि युरोपमध्येही त्यांच्या मालमत्ता आहेत. त्यांच्याकडे फेरारी ४८८ पिस्ता, बेंटले कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पर, रोल्स-रॉइस फँटम आणि कस्टम मर्सिडिज मेबॅच एस ६०० सारख्या महागड्या गाड्या आहेत. गल्फस्ट्रीम जी ५५० आणि एअरबस ए ३२० ही विमानेही आहेत.