scorecardresearch

जानेवारीत घाऊक महागाई दर घटून ४.७३ टक्क्यांवर

घाऊक महागाई दरातील हा घसरणक्रम सलग आठव्या महिन्यात सुरू राहिला आहे.

as wholesale inflation

पीटीआय, नवी दिल्ली : उत्पादित वस्तू तसेच इंधन व ऊर्जा किमतीतील उताराच्या परिणामी सरलेल्या जानेवारीत घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ४.७३ टक्के पातळीवर घसरल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. घाऊक महागाई दरातील हा घसरणक्रम सलग आठव्या महिन्यात सुरू राहिला आहे. त्याउलट केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, किरकोळ महागाई दर हा मुख्यत: अन्नधान्य घटकांच्या किमती वाढल्याने जानेवारीमध्ये ६.५२ टक्के असा तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला.

घाऊक किंमत निर्देशांकातही, डिसेंबरमधील उणे (-) १.२५ टक्के पातळीवरून, जानेवारीत अन्नधान्य घटकांच्या किमतीत २.३८ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून आली. तरी या निर्देशांकावर आधारित महागाई दर डिसेंबर २०२२ मधील ४.९५ टक्क्यांच्या तुलनेत, नववर्षांतील पहिल्या महिन्यात ४.७३ टक्क्यांवर ओसरला. जानेवारी २०२२ मध्ये तो १३.६८ टक्के पातळीवर नोंदवण्यात आला होता.

जानेवारीमधील महागाई दरातील घसरण ही मुख्यत्वे खनिज तेल, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कापड, क्रूड पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कापड आणि खाद्य उत्पादने यांच्या संथावलेल्या किमतींचा परिणाम असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. अन्नधान्य घटकांमध्ये, डाळींच्या किमती २.४१ टक्के वाढल्या, तर भाजीपाला किमती २६.४८ टक्क्यांनी नरमल्या, तेलबियांच्या किमतीत उणे (-) ४.२२ टक्क्यांचा उतार जानेवारीत दिसून आला. दुसरीकडे इंधन आणि ऊर्जा घटकांमधील महागाई डिसेंबर २०२२ मधील १८.०९ टक्क्यांवरून, १५.१५ टक्क्यांपर्यंत कमी झाली. उत्पादित वस्तूंमध्येही डिसेंबर २०२२ मधील ३.३७ टक्क्यांच्या तुलनेत जानेवारी २०२३ मध्ये २.९९ टक्के अशी घसरण दिसून आली. 

 घाऊक किंमत निर्देशांकामधील घसरण सोमवारी जाहीर झालेल्या किरकोळ चलनवाढीच्या आकडेवारीच्या विपरीत आहे. ज्यामध्ये ग्राहक किंमत निर्देशांक किंवा किरकोळ महागाई डिसेंबर २०२२ मध्ये ५.७२ टक्क्यांवरून जानेवारीमध्ये ६.५२ टक्क्यांवर पोहोचली आहे.

किरकोळ महागाईचे अनुमान हुकले!

खनिज तेलाची (भारतात आयातीची) सरासरी किंमत पिंपामागे ९५ अमेरिकी डॉलर राहील असे गृहीत धरून, रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी महागाईचा अंदाज २०२२-२३ या संपूर्ण वर्षांसाठी ६.५ टक्क्यांपर्यंत अलीकडेच झालेल्या बैठकीअंती सुधारून घेतला आहे, जो आधीच्या अनुमानानुसार ६.८ टक्क्यांवर होता. सुधारित अनुमानानुसार, जानेवारी ते मार्च तिमाहीसाठी रिझव्‍‌र्ह बँकेचा किरकोळ महागाई दर हा सरासरी ५.७ टक्के राहण्याची अपेक्षा आहे. मात्र सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, महागाई दर या अनुमानापेक्षा किती तरी जास्त ६.५२ टक्क्यांपर्यंत कडाडला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 00:02 IST
ताज्या बातम्या