नवी दिल्ली: घाऊक महागाई दरात सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात वाढ झाली असली, तरी तो उणे ०.३२ टक्के नोंदवण्यात आला, असे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले. ही वाढ प्रामुख्याने डाळी आणि भाज्यांच्या किमती कडाडल्यामुळे असल्याचे आकडेवारीचा तपशील सूचित करतो.
आधीच्या म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारीत महागाई दराने २७ महिन्यांतील नीचांकी अशी उणे १.२१ टक्क्यांची पातळी गाठली होती. तर गेल्या वर्षी याच महिन्यात घाऊक महागाईचा दर २.१६ टक्के पातळीवर होता.
खाद्यवस्तूंच्या किमतीत ऑक्टोबरमध्ये ८.३१ टक्के घट झाली होती. ही घट नोंव्हेंबरमध्ये कमी होऊन ४.१६ टक्के नोंदविण्यात आली. याचवेळी भाज्यांच्या किमतीत ऑक्टोबरमध्ये ३४.९७ टक्के घट झाली होती. ही घट नोव्हेंबरमध्ये मंदावून २०.३३ टक्के झाली. घाऊक महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये उणे नोंदविला जाण्यामागे खाद्यवस्तू, खनिज तेल, तेल व नैसर्गिक वायू, मूलभूत धातू निर्मिती आणि वीज यांच्या किमतीत झालेली घसरण आहे, असे केंद्रीय उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर झाली होती. किरकोळ महागाई दर नोव्हेंबरमध्ये ०.७१ टक्के नोंदविण्यात आला आहे. त्याआधीच्या महिन्यात (ऑक्टोबर) तो ०.२५ टक्के या विक्रमी नीचांकी पातळीवर होता. महागाईचा दर कमी असल्याने रिझर्व्ह बँकेला डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला व्याजदरात पाव टक्का कपात करणे आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्राधान्य देणे शक्य झाले. यंदाच्या पतधोरण आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दराचे उद्दिष्ट २.६ टक्क्यांवरून कमी करून २ टक्क्यांवर आणले आहे. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदराबाबत निर्णय घेताना किरकोळ महागाई दरालाच प्रामुख्याने विचारात घेतले जाते.
घाऊक महागाई दरात नोव्हेंबर महिन्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असलेला रुपया आणि वस्तूंच्या किमतीत सुरू असलेली वाढ याचा परिणाम महागाईवर होताना दिसून येत आहे. तूर्त तरी तो आटोक्यात असल्याचे आणि चिंताजनक नसल्याचे मत ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ, आदिती नायर म्हणाल्या.
अत्यल्प महागाई आणि उच्च विकास दराचे दुर्मिळ असे सुवर्णपर्व (गोल्डीलॉक पिरियड) आपण सध्या अनुभवत आहोत, असे पतधोरण बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनीही मत व्यक्त केले आहे.
