नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रोने सरलेल्या डिसेंबर तिमाहीत ३,११९ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ७ टक्क्यांची घसरण झाली आहे. नव्याने मंजूर कामगार कायद्यानुसार देशातील कर्मचाऱ्यांसाठी चार कामगार संहिता लागू करण्यात झाल्या असून, त्यातील काही तरतुदींची अंमलबजावणी ही माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासह विविध क्षेत्रातील कंपन्यांसाठी आव्हानात्मक ठरली आहे. त्याचाच परिणाम विप्रोच्या तिसऱ्या तिमाहीतील नफ्यावर दिसला आहे. नवीन कामगार संहितांच्या अंमलबजावणीमुळे ३०२.८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

बंगळूरु येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीने मागील वर्षी याच कालावधीत ३,३५३.८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. विप्रोचा कामकाजातून मिळणारा महसूल तिसऱ्या तिमाहीत ५.५ टक्क्यांनी वाढून २३,५५५.८ कोटी रुपये झाला, जो मागील वर्षी याच कालावधीत २२,३१८.८ कोटी रुपये होता.

तिमाही-दर-तिमाही आधारावर, विप्रोचा नफा ३.९ टक्क्यांनी घसरला, तर महसूल ३.७ टक्क्यांनी वाढला. तिसऱ्या तिमाहीत, अपेक्षेनुरुप सर्वसमावेशक वाढ साधली. कृत्रिम प्रज्ञा (एआय) धोरणात्मक गरज बनत असताना, विप्रो इंटेलिजन्स एक वेगळेपण म्हणून उदयास येत आहे आणि या तिमाहीत अनेक यश मिळवण्यात त्याचे मोठे योगदान राहिले आहे. एआय सक्षम मंच आणि जागतिक स्तरावर नावीन्यपूर्ण विस्तार साधला आहे, असे विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास पल्लिया म्हणाले.

मोठ्या प्रतिस्पर्धी कंपन्या टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएलटेकलाही त्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये नवीन कामगार संहितांच्या अंमलबजावणीचा मोठा परिणाम जाणवला आहे.

सहा रुपये अंतरिम लाभांश

कंपनीच्या संचालक मंडळाने सहा रुपये अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. मुंबई शेअर बाजारात विप्रोचा समभाग २.७९ टक्के म्हणजेच ७.२५ रुपयांनी वधारून २६७.४५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २.८० लाख कोटींचे बाजारभांडवल आहे.

टेक महिंद्रच्या नफ्यात १४ टक्के वाढ

टेक महिंद्राचा तिसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफा १४ टक्क्यांनी वाढून १,१२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. महिंद्रा समूहाच्या या कंपनीने गेल्या वर्षी याच कालावधीत ९८३.२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि मागील सप्टेंबर तिमाहीत १,१९४ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत कंपनीचा कामकाजातून मिळणारा महसूल वाढून १४,३९३ कोटी रुपयांवर पोहोचला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १३,२८६ कोटी रुपये आणि सप्टेंबर २०२५ मध्ये संपलेल्या तीन महिन्यांतील १३,९९४ कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिला आहे.