मुंबई : भारतातील कामकरी महिलांसाठी अनुकूल शहरांमध्ये, बेंगळुरूने २०२५ मध्ये सलग दुसऱ्या वर्षी अव्वल स्थान कायम राखले असल्याचे, कार्यस्थळ संस्कृतीबाबत सल्लागार सेवा प्रदात्या अवतार समूहाच्या सर्वेक्षणातील निष्कर्षांनी बुधवारी स्पष्ट केले. उल्लेखनीय म्हणजे महिलांसाठी सर्वात समावेशक उद्योग-व्यवसाय असणाऱ्या शहरांमध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सलगपणे दुसऱ्या स्थानी ढकलली गेली आहे, तर पुणे या बाबतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
अवतार समूहाच्या सर्वेक्षणाचे यंदाचे हे चौथे वर्ष असून, देशातील १२५ शहरांमध्ये उद्योगातील कार्यसंस्कृती आणि महिलांच्या दृष्टीने सामाजिक समावेशकतेच्या अंगाने पाहणीअंती अव्वल १० शहरांची सूची तयार करण्यात आली आहे.
महिलांचा कार्यबलात सहभाग, महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि करिअर सातत्य तसेच करिअर उत्कर्षाला समर्थन, या बरोबरीने धोरणकर्ते, समुदाय, संस्था आणि शहर प्रशासनाने महिलांसाठी अनुसरलेल्या सर्वोत्तम पद्धती या निकषांच्या आधारे हा शहरांचा समावेशकता निर्देशांक तयार करण्यात आला आहे, असे अवतार समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. सौंदर्य राजेश म्हणाल्या.
एकंदरीत क्रमवारीत मुंबई पाचवी
मुंबई महानगर हे औद्योगिक सहभागितेत दुसऱ्या स्थानी जरी असले तरी सामाजिक सहभागात खूप पिछाडीवर पडल्याने, एकूण समावेशकता निर्देशांकात ते पाचव्या स्थानी घसरले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मुंबईची दोन पायऱ्यांनी घसरण झाली आहे, तर पुणे दोन पायऱ्यांच्या प्रगतीसह मुंबईपुढे तिसऱ्या स्थानावर आहे. औद्योगिक व सामाजिक अशा दोन्ही अंगाने सर्वात समावेशक पहिल्या पाच शहरांची क्रमवारी ही बेंगळुरू, चेन्नई, पुणे, हैदराबाद, मुंबई अशी आहे.
उल्लेखनीय म्हणजे पहिल्या १० शहरांमध्ये दक्षिण भारतातील पाच शहरे आहेत. तर उत्तर भारतातील एकमेव गुरूग्राम शहराला निर्देशांकात सहावे स्थान कमावता आले आहे. ७ ते १० व्या स्थानावर कोलकाता, अहमदाबाद, तिरुवअनंतपुरम, कोइम्बतूर या शहरांचा क्रम आहे.
पूर्वापार अनेक नामांकित देशी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या आस्थापना आणि कार्य जाळे अस्तित्वात असणे ही बेंगळुरू, मुंबई, पुणे, चेन्नई या सारख्या शहरांच्या पथ्यावर पडली असल्याचे डॉ. सौंदर्या म्हणाल्या.
देशातील इतर ठिकाणांहून स्थलांतरण आणि निवासासाठी या शहरांमध्ये सुयोग्य वातावरण असणे, शहर वाहतुकीची उत्तम पायाभूत सुविधा, परिवहन अशा सहाय्यक सेवा तसेच सुरक्षा यंत्रणा, सार्वजनिक सेवा आणि आरोग्य आणि शिक्षणाची उपलब्धता यासारख्या सामाजिक समावेशकता अव्वल शहरांच्या पथ्यावर पडली आहे. प्रादेशिकदृष्ट्या, दक्षिण भारत हे महिलांसाठी सर्वात समावेशक म्हणून उदयास आले आहे.
