वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढ साधत असलेली भारतीय अर्थव्यवस्था विद्यमान २०२५ सालात जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात ‘आयएमएफ’ने ताज्या जागतिक अर्थव्यवस्थेचा भविष्यवेध घेणाऱ्या अहवालात वर्तविला आहे.

आयएमएफच्या अहवालानुसार, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनांतील चालू किमतीतील वाढ अर्थात नॉमिनल जीडीपी हा आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४,१८७.०१ अब्ज अमेरिकी डॉलर राहिल, जो जपानच्या अंदाजित ४,१८६.४३ अब्ज अमेरिकी डॉलरच्या जीडीपीपेक्षा किंचित वरचढ असेल.

भारताने जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून ब्रिटनला मागे सारून २०२४ मध्ये स्थान मिळविले. पण चालू आर्थिक वर्षात ती चौथ्या स्थानी तर नंतरच्या काही वर्षात म्हणजे २०२८ पर्यंत जर्मनीलाही मागे टाकून तीन जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनलेली दिसून येईल, असा आयएमएफच्या अहवालाचा कयास आहे.

भारताचा जीडीपी २०२८ पर्यंत ५,५८४.४७६ अब्ज अमेरिकी डॉलरची पातळी गाठेल, जो त्या समयी ५,२५१.९२८ अब्ज डॉलरवर असू शकणाऱ्या जर्मनीच्या जीडीपीला मागे टाकणारा ठरेल, असे आयएमएफचा अहवाल सूचित करतो. पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्यही भारताकडून २०२७ मध्ये ५,०६९.४७ अब्ज डॉलरच्या जीडीपीसह गाठले जाण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीन या जगातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था असून, नजीकच्या काळात म्हणजे आगामी दशकभरासाठी तरी त्या त्यांचे स्थान कायम राखतील, असा आयएमएफच्या अहवालाचा अंदाज आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ ही २०२५-२६ मध्ये ६.२ टक्के दराने होईल, असा आयएमएफचा सुधारीत अंदाज आहे. या आधी जानेवारीमध्ये हा वाढीचा दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज तिने वर्तविला होता. जो जागतिक व्यापार-तणावाने निर्माण केलेली अनिश्चितता, प्रतिकूल भू-राजकीय घडामोडीनंतर ०.३ टक्क्यांपर्यंत खालावण्यात आला आहे.  

आयएमएफचा २०२५-२६ साठी भविष्यवेध

देश जीडीपी (अब्ज डॉलर)

१. अमेरिका   ३०,५०७.२१८
२. चीन १९,२३१.७०५
३. जर्मनी   ४,७४४.८०४
४. भारत    ४,१८६.४३१
५. जपान   ४,१८६.४३१
६. ब्रिटन   ३,८३९.१८
७. फ्रान्स   ३,२११.२९२
८. इटली   २,४२२.८५५
९. कॅनडा  २,२२५.३४१
१०. ब्राझील   २,१२५.९५८