मुंबई : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने तिच्या २ लाख ३६ हजार कर्मचाऱ्यांचा कौशल्य विकास आणि वित्तीय समज वाढविण्यास मदत म्हणून आठवड्यातून दोनदा योग प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जाणार असल्याचे सोमवारी अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
स्टेट बँकेने कर्मचाऱ्यांच्या वित्तीय प्रशिक्षणासाठी एफपीएसबी इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकृत वित्तीय नियोजनकाराचे प्रशिक्षण देऊन त्याचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. अनिवासी भारतीय, श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्तींशी निगडित वित्तीय बाबींचे ज्ञान या कर्मचाऱ्यांना यातून मिळविता येणार आहे. यामुळे बँकेला आपल्या शाखा आणि डिजिटल नेटकवर्कच्या माध्यमातून वित्तीय नियोजनाची सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देता येईल, अशी माहिती स्टेट बँकेने दिली.
कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून त्यांना योग प्रशिक्षण दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्टेट बँकेचे ४०० अधिकारी व कर्मचारी योग प्रशिक्षणात सहभागी झाले होते. आता बँकेच्या कर्मचाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून योग प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यातही सुधारणा होईल, असे बँकेने नमूद केले आहे.