वृत्तसंस्था, नवी दिल्ली झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसने कर्जाची परतफेड करण्यासाठी कर्जदात्या बँकांसोबत तडजोडीसाठी चर्चा सुरू केली असून १० अब्ज डॉलर मूल्याची कंपनी बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. सोनी आणि झीचे विलीनीकरण होण्यात हा एकमेव अडथळा उरला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयडीबीआय बँकेने झीच्या विरोधात दिवाळखोरीचा दावा मागे घेतला आहे. आता झीने बँकेचे १.४९ अब्ज रुपयांचे कर्ज हे समभागांच्या रुपात फेडण्याची तयारी दाखवली आहे. याचबरोबर झीचे संस्थापक ॲक्सिस बँक आणि जे सी फ्लॉवर्स अँड कंपनी यांच्यासोबतही स्वतंत्रपणे चर्चा करीत आहेत. झी समूहाच्या मालकीच्या कंपन्यांच्या ४० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. हेही वाचा - देशातील आघाडीची आयटी कंपनी आता विकणार पीठ, तांदूळ, डाळ; अंबानी-अदाणींच्या कंपन्यांशी स्पर्धा करणार माध्यम क्षेत्रातील मोठी कंपनी बनणार सोनी आणि झी यांच्या विलीनीकरणासाठी थकीत देणी फेडली जाणे आवश्यक आहे. या विलीनीकरणानंतर माध्यम क्षेत्रातील एक मोठी कंपनी निर्माण होणार आहे. नव्या कंपनीत सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचा अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा असणार आहे. झीच्या संस्थापकांकडे ३.९९ टक्के हिस्सा असेल आणि उरलेला हिस्सा सार्वजनिकरुपात किरकोळ भागधारकांकडे असेल, असे सूत्रांनी सांगितले.