Financial Readiness for Marriage : देशात तरुणांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यापाठीमागे अनेक कारणे आहेत. यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा (पगार, घर, शिक्षण) खूप वाढल्या आहेत. त्यामुळे योग्य जोडीदार मिळण्यात अडचणी येतात. पूर्वी शिक्षण, घर, शेतीवाडी आणि पगार विचारला जायचा. आता थेट बँक बॅलन्स विचारला जात आहे. अशात लग्नासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे म्हणजे नक्की काय? या प्रश्नावर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. एका ३० वर्षीय आयटी कर्मचाऱ्याने सोशल प्लॅटफॉर्म ‘रेडिट’वर (r/personalfinanceindia) आपली हीच घालमेल मांडली आहे.

२८ लाखांचे पॅकेज अन् ४० लाखांचा बॅलन्स पुरेसा आहे का?

तरुणाने रेडिटवर लिहिलंय, की त्याला वार्षित २८ लाखांचे पॅकेज असून बँक खात्यात ४० लाख रुपयांची बचत आहे. यापूर्वी त्याने रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. चालू किंवा पुढील वर्षात लग्न करण्याचा आणि पुढे कुटुंब सुरू करण्याचा त्याचा विचार आहे. मात्र, “४० लाखांची बचत आणि २८ लाखांचे पॅकेज लग्नासाठी पुरेसे आहे का?” असा प्रश्न त्याने विचारला. तरुणाच्या सोशल मीडिया पोस्टनंतर यावर अनेकांना आपापली मते व्यक्त केली आहेत.

नेटकऱ्यांना काय वाटतं?

  • या पोस्टवर विवाहित आणि अनुभवी युजर्सनी दिलेली उत्तर अधिक महत्त्वाची आहेत. एका युजरने लिहिले, “माझे लग्न झाले तेव्हा माझ्यावर ५ लाख रुपयांचे कर्ज होते आणि स्वतःचे घरही नव्हते. तरीही संसार सुरळीत सुरू झाला, त्यामुळे जास्त काळजी करू नका.”
  • दुसऱ्या एका नेटकऱ्याने सांगितले की, गैरव्यवस्थापनामुळे लग्नाच्या वेळी त्याच्यावर ८ लाखांचे वैयक्तिक कर्ज होते. “लग्न ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. जोडीदार समजून घेणारा असेल तर शून्यातूनही विश्व उभे करू शकता.
  • “पैसा कधीच कोणाला पुरत नाही. उत्पन्नानुसार गरजा बदलतात. त्यामुळे योग्य व्यक्ती भेटल्यास पैशांच्या आकड्यासाठी लग्न लांबवू नका,” असा सल्ला एका युझरने दिला.
  • “आम्ही लग्न केलं तेव्हा दोघांचे मिळून केवळ १२ लाख रुपये उत्पन्न होते, आज ४ वर्षांनी आमचे उत्पन्न चार पट झाले आहे. परस्पर विश्वासाने हे शक्य झाले, तुम्हीही करू शकता” असा सल्ला एका दांपत्याने दिला.
Is ₹40 lakh in savings enough to get married and start a family in India?
byu/ConclusionBright6579 inpersonalfinanceindia

अर्थतज्ज्ञांचा काय आहे सल्ला?

या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की, लग्नासाठी कोणतीही एक ‘मॅजिक फिगर’ नाही. विवाह आणि कुटुंब नियोजनासाठी केवळ बचत पुरेशी नसून, जोडीदारांकडे असलेली अर्थसाक्षरता अधिक महत्त्वाची आहे. लग्नासाठी वारेमाप खर्च करुन कर्जबाजारी होण्यापेक्षा, साध्या पद्धतीने विवाह करुन भविष्यासाठी चांगली आर्थिक गुंतवणूक करता येऊ शकते.