मुंबई : फ्लेक्सी-कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये जानेवारी-जुलै २०२६ या काळात जवळपास ५०,००० कोटी रुपयांचा निव्वळ ओघ आला. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारातील कंपन्यांच्या आकारमानानुसार (मार्केट-कॅप) विविध श्रेणींमध्ये गतिशीलपणे गुंतवणूक बदलण्याची क्षमता असलेल्या इक्विटी धोरणांना गुंतवणूकदारांनी पसंती दिल्याने ही वाढ दिसून आली आहे.
गुंतवणुकीच्या या जोरदार ओघासोबतच गुंतवणूकदार आणि व्यवस्थापनाखालील मालमत्तेमध्येही (एयूएम) मोठी वाढ झाली आहे. फ्लेक्सी-कॅप फंडांच्या ‘फोलिओ’ची (गुंतवणूकदार खात्यांची) संख्या जुलै २०२६ मध्ये २.४४ कोटींवर पोहोचली, जी वर्षभरापूर्वी १.९४ कोटी होती; म्हणजेच यात सुमारे ५० लाख नवीन गुंतवणूकदार खात्यांची भर पडली.
‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या (अॅम्फी आकडेवारीनुसार, जुलै २०२६ अखेरीस या श्रेणीतील व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) सुमारे ६ लाख कोटी रुपये नोंदवली गेली, जी गेल्यावर्षी म्हणजेच जुलै २०२५ मध्ये ४.९४ लाख कोटी रुपये होती. जुलैमध्ये मासिक गुंतवणुकीचा ओघ काहीसा मंदावला असला तरी, इक्विटी म्युच्युअल फंड गुंतवणुकीत या श्रेणीचा मोठा वाटा कायम राहिला. फ्लेक्सी-कॅप फंडांना जुलैमध्ये ४,७०९ कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे, तर जूनमध्ये हा आकडा ५,२३१ कोटी रुपये होता.
फ्लेक्सी-कॅप फंडांनी वार्षिक आधारावर २५.७ टक्के इतकी सर्वाधिक फोलिओ वाढ नोंदवली. तसेच, जोरदार गुंतवणुकीमुळे एकूण निव्वळ इक्विटी गुंतवणुकीत या फंडांचा वाटा गेल्या महिन्यात १९ टक्के आणि गेल्या १२ महिन्यांत २७ टक्के राहिला आहे, असे ‘क्वांटम एएमसी’चे मुख्य गुंतवणूक अधिकारी चिराग मेहता यांनी सांगितले. मेहता यांच्या मते, वाढती गुंतवणूक केवळ परताव्याच्या शोधापुरती मर्यादित नाही; गुंतवणूकदार आता विशिष्ट मार्केट-कॅप श्रेणीशी बांधून राहण्याऐवजी फंड व्यवस्थापकाच्या निर्णयानुसार गुंतवणूक वाटप करण्याकडे वळत आहेत. एखाद्या विशिष्ट मार्केट-कॅप श्रेणीत अडकून पडणाऱ्या धोरणांपेक्षा, परिस्थितीनुसार वेगाने बदलू शकणाऱ्या धोरणांना गुंतवणूकदार पसंती देत असल्याचे दिसून येते.
उद्योगाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी-जुलै २०२६ या काळात फ्लेक्सी-कॅप योजनांमध्ये ४९,९१५ कोटी रुपयांचा निव्वळ ओघ नोंदवला गेला. केवळ मार्च तिमाहीत २४,६५१ कोटी रुपये आणि जून तिमाहीत २०,५५५ कोटी रुपयांचा ओघ आला. जुलै महिन्यात या योजनांमध्ये ४,७०९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. गेल्यावर्षी म्हणजेच जानेवारी-जुलै २०२५ मध्ये या श्रेणीत ३९,१८७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
