Flipkart Fraud Consumer Court Refund : फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनसारख्या ई-कॉमर्स साईटवरुन वस्तू मागवणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील एका ग्राहकाने फ्लिटकार्टवरुन १ लाख ११ हजार रुपयांचा आयफोन ऑर्डर केला, पार्सल उघडल्यावर आत ‘दाढीला लावण्याचे तेल’ निघाले. ग्राहकाने फ्लिपकार्टकडे तक्रार केली असता, आम्ही फक्त मध्यस्थ असल्याचे सांगत कंपनीने हात झटकले. शेवटी ग्राहकाने ग्राहक मंचाचे दार ठोठावले. मुंबई जिल्हा ग्राहक निवारण मंचाने या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यातून ग्राहकांसाठीही मोठा धडा मिळाला आहे.

मागवला आयफोन निघाले दाढीचे तेल

मुंबईतील पवई भागात राहणाऱ्या एका ग्राहकाने २२ एप्रिल २०२३ रोजी फ्लिपकार्टवरून १ लाख ११,००० रुपयांचा ‘आयफोन १४ प्रो’, चार्जर आणि फोन कव्हर ऑर्डर केले होते. पार्सल उघडल्यानंतर बॉक्समध्ये ऑर्डर केलेली एकही वस्तू नव्हती. तर दाढी वाढवण्याचे तेल होते. हा प्रकार पाहून ग्राहकाला मोठा धक्का बसला. त्याने लगेच फ्लिपकार्टकडे तक्रार केली. पण, आम्ही फक्त मध्यस्थ असून तुम्ही विक्रेत्याकडे तक्रार करा असे सांगून हात वर केले.

विक्री करून ई-कॉमर्स कंपन्या हात वर करू शकत नाहीत

या प्रकरणाची सुनावणी करताना जिल्हा मंचाचे अध्यक्ष प्रदीप कडू आणि सदस्या गौरी कापसे यांनी फ्लिपकार्टच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “एखादी वस्तू विकल्यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म केवळ मध्यस्थ असल्याचे सांगून स्वतःची जबाबदारी झटकू शकत नाही. ग्राहकाने वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल न घेणे ही सेवेतील मोठी त्रुटी असून ही ‘अनुचित व्यापारी प्रथा’ आहे,” असे निरिक्षण ग्राहक मंचाने नोंदवले. ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी आणि सेवेत त्रुटी ठेवल्याप्रकरणी ग्राहक मंचाने फ्लिपकार्ट आणि विक्रेत्याला संयुक्तपणे ७०,००० रुपयांची भरपाई आणि आयफोनच्या संपूर्ण रक्कमेचा परतावा व्याजासह देण्याचे ऐतिहासिक आदेश दिले आहेत.

ऑनलाईन ऑर्डर करताना काय काळजी घ्यावी?

कोणतीही महागडी वस्तू डिलिव्हर होताच पार्सल उघडतानाचा सलग व्हिडिओ रेकॉर्ड करा. म्हणजे भविष्यात पुरावा म्हणून उपयोगी येईल.
वस्तू पूर्णपणे तपासून होईपर्यंत पार्सलवरील लेबल, बिल आणि ईमेल पुरावे सुरक्षित ठेवा.
जर वस्तूमध्ये काही त्रुटी आढळल्यास तत्कार कंपनीकडे तक्रार करा. कंपनीने ४८ तासांत प्रतिसाद न दिल्यास तात्काळ १९१५ या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर तक्रार नोंदवा.