Why flipkart laid off 500 employees: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने कामगिरीच्या आढाव्याच्या आधारावर सुमारे ४००-५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अनेक व्यक्तींनी इकॉनॉमिक टाईम्सला दिली आहे.

नोकरीवरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येच्या ३-४ टक्के आहे, जे दरवर्षी खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या १-२ टक्के कपातीपेक्षा जास्त आहे.

“फ्लिपकार्ट अपेक्षांनुसार नियमितपणे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेते. या प्रक्रियेचा भाग म्हणून काही कर्मचाऱ्यांना कंपनीतून जावे लागू शकते. आम्ही याचा फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांना या स्थित्यंतरासाठी सर्वतोपरी मदत करत आहोत”, असे फ्लिपकार्टने सांगितल्याचा उल्लेख इकॉनॉमिक टाईम्सने आपल्या वृत्तात केला आहे.

“यावर्षी फ्लिपकार्टमध्ये नेहमीपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन अंतर्गत ठेवण्यात आले आहे. वार्षिक आढाव्यात अनेकांना एक स्टार रेटिंग मिळाले असून त्यांना कंपनी सोडण्यास सांगण्यात आले आहे”, असे या घडामोडींची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले.

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये फ्लिपकार्टची मार्केटप्लेस शाखा असलेल्या फ्लिपकार्ट इंटरनेटने २०,४९३ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत १४% जास्त आहे. तर कंपनीचा निव्वळ तोटा ३७% ने घटून १,४९४ कोटी रुपयांवर आला आहे.

फ्लिपकार्टमधील यापूर्वीची कर्मचारी कपात

विशेष म्हणजे फ्लिपकार्टने अशा प्रकारचे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२४ च्या सुरुवातीला कंपनीने आपल्या वार्षिक परफॉर्मन्स रिव्ह्यू सायकलचा भाग म्हणून सुमारे १,००० कर्मचाऱ्यांना म्हणजेच त्यांच्या एकूण कर्मचारी संख्येच्या साधारण ५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.

भारतातील आयपीओची तयारी

फ्लिपकार्टमधील ही कर्मचारी कपात अशा वेळी होत आहे, जेव्हा कंपनी भारतात आपल्या संभाव्य आयपीओसाठी तयारी करत आहे. आयपीओच्या व्यवहार्यतेचा अंदाज घेण्यासाठी कंपनीने गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅनली, कोटक महिंद्रा कॅपिटल आणि जेपी मॉर्गन यांसारख्या मोठ्या गुंतवणूक बँकांशी प्राथमिक चर्चा सुरू केली आहे.