India Four-Day Workweek: श्रम आणि रोजगार मंत्रालयाने नुकतेच सोशल मीडियावर नवीन कामगार कायद्यातील कामाच्या तासांबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर भारतात चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याची कल्पना पुन्हा चर्चेत आली आहे. अनेक कर्मचारी आता विचारत आहेत की, भारतात खरोखरच आठवड्यातून फक्त चार दिवस काम करून पूर्ण आठवड्याचा पगार मिळू शकतो का? त्याचे उत्तर हो असू शकते, पण ते फक्त नवीन कामगार कायद्यांनुसार शक्य आहे.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सांगितले की, “नवीन कामगार कायद्यात कामाच्या चार दिवसांच्या आठवड्याची तरतूद आहे. या चार दिवसांत १२ तास काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना उर्वरित तीन दिवस पगारी सुट्टी मिळेल. साप्ताहिक कामाचे तास ४८ तास निश्चित राहतील आणि दैनंदिन तासांपेक्षा जास्त केलेल्या अतिरिक्त कामासाठी दुप्पट वेतन दिले मिळेल.”
चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याचे स्वरूप
याचा अर्थ असा की, एखादा कर्मचारी चार दिवस, प्रत्येक दिवशी १२ तास काम करून तीन दिवस पगारी सुट्टी घेऊ शकतो. पण आठवड्यातील एकूण कामाचे तास ४८ पेक्षा जास्त असू शकत नाहीत. जर एखाद्या कर्मचाऱ्याने दिवसातून १२ तासांपेक्षा जास्त काम केले, तर त्या अतिरिक्त वेळेला ओव्हरटाईम मानले जाईल आणि त्यासाठी दुप्पट पगार दिला जाईल, अशी नव्या कामगार कायद्यात तरतूद आहे
मंत्रालयाने स्पष्ट केले की, १२ तासांचा कामाचा दिवस म्हणजे याचा अर्थ सलग १२ तास काम करणे असा नाही. यात विश्रांती आणि विभागलेल्या कामाचे तास यांचाही समावेश आहे. यामध्ये दुपारच्या जेवणाची सुट्टी, विश्रांतीची वेळ किंवा शिफ्टमधील अंतर यांचा समावेश असू शकतो.
अंतिम निर्णय कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या हातात
चार दिवसांचा कामाचा आठवडा सक्तीचा नाही. हा केवळ एक पर्याय आहे, ज्यावर कंपनी आणि कामगारांच्या सहमतीने अंमलबजावणी होऊ शकते. काही कंपन्या पाच किंवा सहा दिवसांचा आठवडा ठेवू शकतात, तर काही कंपन्या चार दिवसांचा कमाचा आठवडा लागू करू शकतात.
अंतिम निर्णय कंपनीच्या धोरणांवर, राज्यांच्या नियमांवर आणि कामाच्या स्वरूपावर अवलंबून असेल. सर्व प्रकारची कामे १२ तासांच्या दिवसाच्या पद्धतीमध्ये सहज बसत नाहीत, विशेषतः ज्या ठिकाणी २४ तास कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते.
