मुंबई : फ्रँकलिन टेम्पलटन (इंडिया) ने मुदतमुक्त (ओपन-एंडेड) श्रेणीतील अल्पकालीन कर्ज गुंतवणूक योजनेंतर्गत फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंड (एफआयएसटीएफ) ही नवीन म्युच्यूअल फंड योजना गुंतवणूकदारांसाठी आणत असल्याची आज घोषणा केली आहे. या फंड योजनेंतर्गत साकारल्या जाणाऱ्या पोर्टफोलिओचा कालावधी हा मॅकाले ड्युरेशन या तत्वानुसार १ ते ३ वर्षांचा राहणार आहे.
पोर्टफोलिओत उच्च दर्जाच्या कॉर्पोरेट कर्ज योजना (सिक्युरिटीज), राज्य विकास कर्जे (एसडीएल), सरकारी हमी रोखे (जीसेक) आणि चलन बाजारातील साधन आदी घटकांमध्ये गुंतवणूक करण्याचे या फंडाचे उद्दीष्ट आहे. या पोर्टफोलिओमध्ये प्रामुख्याने ट्रिपल ए आणि एए प्लस दर्जा असलेले कॉर्पोरेट रोखे आणि सार्वभौम रोख्यांचा समावेश असू शकतो.
फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंडचे व्यवस्थापन फ्रँकलिन टेम्पलटन इंडिया फिक्स्ड इन्कमचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राहुल गोस्वामी हे सांभाळणार असून त्यांना उपाध्यक्ष आणि पोर्टफोलिओ मॅनेजर अनुज टगरा आणि रोहन मारू यांचे सहकार्य राहणार आहे.
फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंडचा एनएफओ ५ ऑगस्ट २०२६ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.
आमच्या गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थिर उत्पन्न योजना वाढविण्यास फ्रँकलिन टेम्पलटन इंडिया कटिबद्ध आहे. उच्च दर्जाच्या कर्ज योजनांवर केंद्रित राहणारे परंतु त्याचबरोबर उत्पन्न क्षमता आणि योग्य जोखीम व्यवस्थापन यांचा समतोल साधणाऱ्या स्थिर उत्पन्न योजनांचे पर्याय उपलब्ध करुन देण्याचे आमचे उद्दीष्ट फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंडच्या शुभारंभामुळे अधोरेखित होते.
स्थिर उत्पन्न योजनांसाठी आमच्याकडे असलेली अनुभवी टीम आणि अतिशय सक्षम जोखीम व्यवस्थापन प्रणालीचा आधार असलेल्या फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंडआधारे गुंतवणूकदारांना बदलत्या बाजारपेठेतील परिस्थितीनुरूप वाटचाल करताना त्यांचे अल्प ते मध्यम मुदतीचे गुंतवणुकीचे ध्येय गाठण्यात नक्कीच मदत होईल, असा आम्हाला विश्वास आहे, असे फंड योजनेबद्दल बोलताना फ्रँकलिन टेम्पलटन-इंडियाचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर म्हणाले.
फंड योजनेच्या गुंतवणुकीच्या धोरणाबद्दल भाष्य करताना फ्रँकलिन टेम्पलटन इंडिया फिक्स्ड इन्कमचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राहुल गोस्वामी म्हणाले, “बदलत्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, स्थिर उत्पन्न योजनांच्या क्षेत्रात अजूनही निवडक संधी उपलब्ध आहेत; विशेषतः उत्पन्न वक्ररेषेच्या अल्प मुदतीच्या टप्प्यावर वधारलेले परतावे, पुरेशी तरलता आणि अनुकूल मागणी-पुरवठा गतिशीलता हे घटक अतिशय फायदेशीर ठरताना दिसत आहेत.
फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंड योजना ही प्रामुख्याने उच्च दर्जाच्या कंपनी कर्ज योजनांवर अतिशय शिस्तबध्द पध्दतीने लक्ष केंद्रित करत तसेच सक्रिय कालावधी व्यवस्थापनाच्या माध्यमातून या संधींचा फायदा घेण्यासाठी उत्तम प्रकारे सज्ज आहे. उत्पन्न वक्ररेषेच्या अल्प ते मध्यम मुदतीत असलेल्या संधींचा अतिशय लवचिकरित्या वेध घेत हा फंड व्याजदर आणि कर्ज जोखीमांचे योग्य व्यवस्थापन करत व्याजावर आधारित परतावा मिळवण्याचे ध्येय ठेवतो. त्यामुळे बाजारपेठेच्या विविध चढउतारांदरम्यान उत्तमरित्या जोखीमेचे व्यवस्थापन करत योग्य उद्दीष्ट गाठण्यास मदत होऊ शकते.”
एनएफओची वैशिष्टये
फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म फंड
योजनेचा प्रकार : ही फंड योजना मुदतमुक्त श्रेणीतील अल्प मुदतीची कर्ज योजना असून ती मॅकाले ड्युरेशन या तत्वानुसार १ ते ३ वर्ष मुदतीच्या कर्जविषयक पर्यांयामध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करत पोर्टफोलिओ साकारणार आहे.
गुंतवणूकीचे उद्दिष्ट : या योजनेचा उद्देश विविध प्रकारच्या कर्ज आणि चलन बाजारातील योजनांमध्ये गुंतवणूक करून अल्प मुदतीत उत्तम परतावा मिळवणे हा आहे. तथापि, या योजनेचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होईलच, याची कोणतीही खात्री देता येत नाही.
एनएफओची तारीख : ५ ऑगस्ट २०२६ ते ११ ऑगस्ट २०२६
नियमित विक्री आणि फेरखरेदीसाठी योजना खुली होण्याची तारीख : १३ ऑगस्ट २०२६
व्यवस्थापन जबाबदारी : राहुल गोस्वामी, अनुज टगरा आणि रोहन मारू
किमान गुंतवणूक : रुपये ५,००० आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत
आधारभूत निर्देशांक : निफ्टी शॉर्ट ड्युरेशन डेट इंडेक्स ए-II
