Gen Z home buying vs renting India : ‘स्वतःचं हक्काचं घर म्हणजे आर्थिक सुरक्षा’ हा विचार दशकांपासून आपल्यावर बिंबवण्यात आला आहे. नोकरी किंवा व्यवसाय सुरू केल्यानंतर काही वर्षे भाड्याने राहून पुढे स्वतःचे घर घेणे हेच प्रत्येकाचे अंतिम ध्येय असायचे. मात्र, आजची नवी पिढी म्हणजेच जेन-झी (Gen Z) या पारंपरिक मानसिकतेला छेद देत आहे. आजचे तरुण भाड्याच्या घरात राहण्याला तडजोड म्हणून पाहत नाहीत, तर महिनाभराचा ईएमआय, नोकरीच्या शक्यता आणि भविष्यातील गुंतवणूक या सर्व घटकांचा विचार करुन गृहखरेदीचा निर्णय घेत आहेत.

जेन-झीने बदलला घर खरेदीचा ट्रेंड

भाड्याने राहावे की स्वतःचे घर खरेदी करावे? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जात आहे. या प्रश्नावर आतापर्यंत घर घेण्याकडेच सर्वांचा कल पाहायला मिळतो. मात्र, आता परिस्थिती बदलताना पाहायला मिळत आहे. या प्रश्नावर जेन-झीमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळतात आणि दोघांचेही विचार तार्कीक आहेत. भाड्याने राहिल्याने शहर किंवा नोकरी बदलण्याचे स्वातंत्र्य मिळते, असे एका वर्गाचे मत आहे. मात्र, विविध सर्वेक्षणांनुसार प्रत्यक्षात भारतातील मेट्रो शहरांमध्ये राहणारे बहुतांश Gen Z तरुण दीर्घकाळासाठी स्वतःचे घर खरेदी करण्यालाच पसंती देत आहेत.

घर घेण्याबाबत जेन-झीचे विचार काय?

स्वतःचे घर भविष्यात आर्थिक सुरक्षितता आणि मालमत्ता निर्माण करते. आजची पिढी केवळ सोशल मीडियाच्या ट्रेंडवर न चालता, स्वतःची कमाई आणि गरजा पाहून व्यावहारिक पावले उचलत आहे. मुंबई, बंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये घरभाड्यात झालेली मोठी वाढ, होम लोनची सुलभ उपलब्धता यामुळे अनेक तरुण पूर्वीपेक्षा कमी वयात घर खरेदी करत आहेत. स्वतःच्या संपूर्ण बचतीऐवजी होम लोनचा वापर करण्याकडे कल वाढला आहे. घर केवळ राहण्याची जागा नसून महागाईविरोधात एक भक्कम गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. अलिकडच्या वर्षांत घर खरेदीदारांमध्ये मिलेनियल्स आणि जेन-झीचा वाटा मोठा आहे.

जेन-झी भाड्याने कधी राहतात?

आजची पिढी गृहखरेदीपूर्वी स्वतःच्या आर्थिक क्षमता तपासून पाहत आहेत. त्यांना कर्जाचे डोंगर आपल्या डोक्यावर नको आहेत. आपल्या पगारातून ईएमआय सहज जाऊ शकले का? याचाही ते विचार करत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यातील रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध असतील? नोकरीनिमित्त सतत स्थलांतर करावे लागणार असेल तर असे तरुण भाड्याने राहण्यालाच पसंती देत आहेत. त्यांच्या मते तुम्ही घर खरेदी केल्यास अडकून पडण्याची शक्यता आहे.

आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी जेन-झीचे ३ मुख्य प्रश्न

  • हा निर्णय माझ्या दरमहाच्या खर्चात बसतो का?
  • यामुळे मला करिअर आणि आयुष्यात हवे तसे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल का?
  • या निर्णयामुळे माझी आर्थिक स्थिती भविष्यात मजबूत होईल का?