मुंबई: कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि विदा विश्लेषण (डेटा ॲनालिटिक्स) क्षेत्रात कार्यरत असलेली आघाडीची कंपनी ‘जेनेक्सएआय ॲनालिटिक्स लिमिटेड’ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) शुक्रवार, ५ जूनपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होत आहे. यातून कंपनीला ५४.६६ कोटी रुपयांचे भांडवल उभारले जाणे अपेक्षित आहे.

सध्या तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रातील कंपन्यांना बाजारात मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता, गुंतवणूकदार या आयपीओकडे आशेने पाहत आहेत. जेनेक्सएआय ही कंपनी उद्योग-व्यवसायांच्या सूज्ञ निर्णय प्रक्रिया आणि भविष्यवेध घेण्यासाठी एआय साधनांचा वापर आणि सल्लागार सेवा प्रदान करते. बँकिंग, वित्तीय सेवा व विमा क्षेत्र, औषध निर्माण, आरोग्यनिगा, निर्मिती क्षेत्र आणि सार्वजनिक उपक्रमांमधील १०० हून अधिक कंपन्या जेनेक्सएआयच्या ग्राहक आहेत.

या आयपीओसाठी कंपनीने प्रत्येकी ११० रुपये ते ११६ रुपये असा गुंतवणूकदारांना बोली लावण्यासाठी किंमत पट्टा निर्धारित केला आहे. समभाग विक्री ५ जून ते ९ जून या कालावधीत सुरू राहिल. चॉइस कॅपिटल ॲडव्हायजर्स या कंपनीकडून व्यवस्थापित या आयपीओपश्चात समभागांचे एनएसई इमर्ज या बाजारमंचावर सूचिबद्धता केली जाईल.हा एसएमई श्रेणीतील आयपीओ असल्याने गुंतवणूकदारांना किमान १,२०० समभागांसाठी बोली लावणारा अर्ज करता येईल.

या आयपीओमधून उभ्या राहणाऱ्या निधीपैकी ५० टक्के निधी हा नवीन उत्पादने व उपाययोजनांच्या विकासासाठी केला जाणार असून, सुमारे ७.२० कोटी रुपये हे खेळत्या भांडवलाची गरज म्हणून, तर उर्वरित रक्कम कर्जाच्या परतफेडीसाठी वापरात येईल. डिसेंबर २०२५ पर्यंत आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांसाठी कंपनीने ६४.२७ कोटी रुपयांच्या एकूण महसुलावर, १०.६६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, असे माहिती जेनेक्सएआयचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश अगरवाल यांनी दिली.

मागील काही वर्षे वार्षिक सरासरी ३० टक्के दराने कंपनीने महसुली प्रगती केली असून, वाढीचा हा दर आगामी काही वर्षे कायम राखला जाईल, असा विश्वास अगरवाल यानी व्यक्त केला. अगरवाल यांची कंपनीत सुमारे ९० टक्के इतकी भागभांडवली हिस्सेदारी असून, आयपीओपश्चात प्रवर्तकांची हिस्सेदारी ही २६.४२ टक्क्यांनी सौम्य होणार आहे. सध्या सल्लागार सेवेचे पारडे जड असलेल्या कंपनीच्या व्यवसायात येत्या काळात उत्पादनांचा (प्रॉडक्ट्स) वाटा वाढून हे प्रमाण ६०:४० या पातळीवर आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सूचित केले.