GIVA Jewellery Ad Controversy : रक्षाबंधन सणाच्या तोंडावर ज्वेलरी ब्रँड जीवाने (GIVA) बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत केलेल्या एका जाहिरातीने मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागल्यानंतर कंपनीने ही जाहिरात मागे घेतली. मात्र, यानंतर जीवा ब्रँड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जाहिरातीमुळे अनेकांना असं वाटतंय की जीवा केवळ राखी विकणारा ब्रँड आहे. प्रत्यक्षात जीवाचे बिझनेस मॉडेल एकदम वेगळं आहे.

प्रस्थापित ब्रँडमध्ये वेगळी ओळख

तनिष्क, पीएनजी आणि झोयासारखे प्रस्थापित ज्वेलरी ब्रँड असताना २०१९ मध्ये इशेंद्र अग्रवाल जीवा ब्रँड भारतीय बाजारात उतरवला. दैनंदिन वापरासाठी आणि गिफ्टिंगसाठी योग्य अशा दागिन्यांवर या ब्रँडचा मुख्य भर आहे. चांदीच्या अंगठ्या, ईअररिंग्स, पेंडंट्स, ब्रेसलेट्स, पैंजण तर गोल्ड आणि लॅब-ग्रोन डायमंडमध्ये सोन्याच्या अंगठ्या, नेकलेस आणि पर्यावरणास पूरक लॅब-ग्रोन हिऱ्यांचे दागिने बनवले जातात. पुरुषांसाठी सिल्व्हर चेन्स, ब्रेसलेट्स आणि मेन्स गिफ्ट सेट्स लोकप्रिय आहेत. भेट देण्यासाठी परफ्युम्स, सुगंधित मेणबत्त्या, ग्रीटिंग कार्ड्स आणि कॉम्बो गिफ्ट बॉक्सची विक्री केली जाते.

केवळ राखी नाही, तर सिल्व्हर ते लॅब-ग्रोन डायमंडपर्यंत विस्तार

GIVA ने आपली खरी ओळख ९२५ स्टर्लिंग सिल्व्हर दागिन्यांपासून तयार केली. पण, बदलत्या बाजारपेठेची गरज ओळखून कंपनीने आता सोन्याचे दागिने आणि आधुनिक ‘लॅब-ग्रोन डायमंड’ क्षेत्रातही विस्तार केला आहे. केवळ महिलांपुरते मर्यादित न राहता, पुरुषांसाठी स्वतंत्र ज्वेलरी कलेक्शन आणि परफ्युम्ससारखे लाइफस्टाइल प्रॉडक्ट्सही कंपनीने बाजारात आणले आहेत.

जाहिरातीचा वाद काय आहे?

रक्षाबंधन सणानिमित्ती आपल्या एका उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी जीवाने अभिनेत्री क्रिती सॅनॉनसोबत एक जाहिरात केली. या जाहिरातीत तिने ब्रॅलेट-स्टाईल ब्लाउज आणि त्याला साजेसा इंडो-वेस्टर्न पोशाख परिधान केला होता. या जाहिरातीत ती आपल्या पाळीव कुत्र्याला राखी बांधताना दिसत आहे. ही जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर क्रिती सेनॉनला ट्रोल करण्यात आले. अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार कंगना रणौतने कृतीच्या कपड्यांवरुन टीका केली. यावर कृतीने पारंपरिक फॅशनमध्ये बदल झाला असून “आपण महिलांना काय घालावे हे सांगणे कधी थांबवणार आहोत?” असं उत्तर दिलं. तिच्या या उत्तराला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर काही राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, वाद वाढल्यानंतर कंपनीने सर्व प्लॅटफॉर्मवरुन ही जाहिरात हटवली आहे.