Gold And Silver Investment Caution: आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडचे कार्यकारी संचालक आणि सीआयओ शंकरन नरेन यांच्या मते, जागतिक बाजारात, विशेषतः अमेरिकेत, घसरण झाली तर २०२६ मध्ये भारतीय इक्विटीची कामगिरी तुलनेने चांगली राहील. नरेन यांनी फायनान्शियल एक्सप्रेसचे जॉयदीप घोष यांच्याशी बोलताना हे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सोने आणि चांदीतील गुंतवणुकीवरही भाष्य केले आहे.

सोने-चांदीतील गुंतवणूक?

सध्याच्या परिस्थितीत किरकोळ गुंतवणूकदारांनी कोणती रणनीती अवलंबली पाहिजे, या प्रश्नाला उत्तर देताना शंकरन नरेन म्हणाले की, “किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे मालमत्ता वाटपातील (असेट अलोकेशन) शिस्त कायम ठेवणे, दीर्घकालीन दृष्टिकोन राखणे आणि बाजारातील अल्पकालीन चढ-उतारांनंतर गुंतवणूक कमी किंवा जास्त करणे टाळणे. बाजार अस्थिर असू शकतो आणि त्यामुळे अल्पकालात परतावा अनिश्चित असू शकतो. सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंनी गेल्या वर्षी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि मौल्यवान धातूंमध्ये स्वतंत्रपणे गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.”

रुपया पुन्हा सावरणार का?

भारत-अमेरिका व्यापार कराराला झालेल्या विलंबामुळे रुपयावर दबाव आला आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर रुपया पुन्हा सावरणार का, असे विचारले असता नरेन म्हणाले की, “हा व्यापार करार पूर्ण झाल्यानंतर जागतिक चलनांच्या तुलनेत रुपयामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. दिशात्मकदृष्ट्या मजबुती अपेक्षित असली तरी, ही वाढ किती असेल याचा अंदाज वर्तवता येत नाही.”

२०२६ मध्ये कोणत्या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी होण्याची अपेक्षा?

२०२६ मध्ये कोणत्या क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी होण्याची अपेक्षा आहे, याबाबत बोलताना नरेन यांनी स्पष्ट केले की, “सर्वसाधारणपणे बहुतेक क्षेत्रांनी आधीच चांगली कामगिरी केली आहे. असे असले तरी तुलनात्मकदृष्ट्या एफएमसीजी, फार्मा आणि आयटीसारखी काही क्षेत्रे, ज्यांनी आतापर्यंत अपेक्षित कामगिरी केली नाही, ती क्षेत्रे पुढे अधिक चांगली कामगिरी करू शकतात.”

…तर भारतीय इक्विटीसाठी हे वर्ष चांगले ठरू शकते

भारतीय बाजारांच्या २०२६ मधील संभाव्य कामगिरीवर बोलताना नरेन म्हणाले की, “आर्थिक दृष्टिकोनातून भारत खूप चांगल्या स्थितीत आहे. २०२५ मध्ये आयकर कपात, जीएसटीमध्ये घट आणि व्याजदरात लक्षणीय कपात या तीन महत्त्वाच्या घडामोडींनी अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला. या उपायांमुळे एकत्रितपणे २०२६ मध्ये वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.”

ते पुढे म्हणाले, “मात्र भारतीय बाजाराची वाटचाल जागतिक घडामोडींवर, विशेषतः अमेरिकन बाजारावर अवलंबून असेल. जर जागतिक बाजार स्थिर राहिले, तर भारतीय इक्विटीसाठी हे वर्ष चांगले ठरू शकते आणि जर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जागतिक बाजारात घसरण झाली, तर भारत तुलनेने चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.”