मुंबई: भारतीय परंपरेत अद्वितीय स्थान राहिलेल्या सोन्यांत गुंतवणूक आता तितकीशी सोपी राहिलेली नाही. किमतीबाबत अस्थिरतेची जोखीम वाढण्यासह, साठवणुकीच्या चिंतेपासून ते शुद्धतेच्या हमीपर्यंत, प्रत्यक्ष सोने खरेदी करणे आणि बाळगणे हे सर्वसामान्यांसाठी आव्हानात्मक बनले आहे. या पार्श्वभूमीवर, सोन्याचे एका सुरक्षित आणि व्यापारयोग्य इलेक्ट्रॉनिक साधनात झालेले रूपांतर अर्थात ‘ईजीआर- इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स’ हा ‘सेबी’ने मान्यता दिलेला पर्याय सर्वोत्तम ठरतो.
विशेषत: भारतीय कुटुंबांकडे असलेल्या अंदाजे २० हजार टन म्हणजेच साधारण पावणे तीन लाख कोटी रुपये किमतीच्या सोन्याचा अनुत्पादक पडून असलेला साठा बाहेर काढण्यासाठी आणि पर्यायाने सोने आयातीवर मदार कमी करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्सचा (ईजीआर) व्यापक रूपात अवलंब सुरू केला जायला हवे, असे कोटक सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि चलन संशोधन विभागाचे प्रमुख अनिंद्य बॅनर्जी यांनी मत व्यक्त केले.
सराफा बाजारावर भाष्य करताना बॅनर्जी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, डी-डॉलरायझेशन अर्थात जागतिक स्तरावर व्यापार आणि आर्थिक व्यवहार हे डॉलर-मुक्त होण्याच्या दिशेने कल आणि प्रयत्न अधिकाधिक आकार घेताना दिसत आहेत, अशा स्थितीत त्या त्या सरकारद्वारे घोषित कायदेशीर चलनाऐवजी गुंतवणूकदारांची पसंती आणि आकर्षण सोन्याकडे वाढत जाणे स्वाभाविक दिसत आहे. कोणतेही सरकार अथवा मध्यवर्ती बँका कृत्रिमरित्या तयार करू शकत नाहीत किंवा नष्ट करू शकत नाहीत असे सोने ही एक शाश्वत आणि श्रेष्ठ मौद्रिक मालमत्ता असल्यामुळे असे घडत असल्याचे त्यांनी सूचित केले. परिणामी अस्थिरता राहिली तरी सोन्याच्या किमतीची वाटचाल वरच्या दिशेने सुरू राहणे अपरिहार्य असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
‘ईजीआर’ गुंतवणूक कसे काम करते?
राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने नुकतेच (४ मे) सोन्याची खरेदी आणि विक्री डिजिटल पद्धतीने करण्याची एक नवीन प्रक्रिया या रूपात ‘ईजीआर’चे अनावरण केेले. ही एक इलेक्ट्रॉनिक पावती (रिसिट) आहे, जी ‘सेबी’ने मान्यता दिलेल्या एखाद्या ‘व्हॉल्ट मॅनेजर’कडे (सुरक्षित कोठार व्यवस्थापकाकडे) जमा केलेल्या प्रत्यक्ष सोन्याच्या बदल्यात दिली जाते. हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील अर्थात ‘डि-मटेरियलाईज्ड’ रोखेच असतात आणि समभागांप्रमाणेच त्यांची शेअर बाजारात खरेदी-विक्री करता येते. म्हणजेच ‘ईजीआर’ हे सुरक्षित कोठारांमध्ये साठवून ठेवलेले प्रत्यक्ष सोन्याचेच प्रतिनिधित्व करत असले, तरी ते औपचारिक आर्थिक व्यवस्थेशी जुळलेले साधन ठरते. जसे एनएसईने १००० ग्रॅम वजनाच्या एका सोन्याच्या बारचे यशस्वीरित्या ‘ईजीआर’मध्ये डि-मटेरियलायझेशन केले आहे. हे प्रत्यक्ष सोन्याचे एका सुरक्षित आणि व्यापारयोग्य इलेक्ट्रॉनिक साधनात झालेले रूपांतर दर्शवते.
‘ईजीआर’च्या बदल्यात प्रत्यक्ष सोने मिळू शकते?
‘ईजीआर’ आणि पारंपरिक गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ईटीएफ) यांमधील गुंतवणुकीतील हा सर्वात मोठा फरक आणि फायदा असल्याचे अनिंद्य बॅनर्जी म्हणाले. हा फरक स्पष्ट करताना ते म्हणाले, ईजीआरमुळे अगदी ईटीएफप्रमाणेच गुंतवणूकदारांना लहान मूल्यांमध्येही सोन्याच्या बाजारात सहभागी होता येते. परंतु ईटीएफ हा स्पॉटचा एक पर्याय आहे. याचा अर्थ जर मी ईटीएफमध्ये गुंतवणूकदार असेन, तर प्रत्यक्ष सोन्याची डिलिव्हरी घेण्याची सोय मला उपलब्ध नाही. पण ‘ईजीआर’मध्ये मला तसे करता येऊ शकते.
ईटीएफचा व्यापार देशात आधीच मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यांचा एक प्रस्थापित गुंतवणूकदार वर्ग आहे, तर ‘ईजीआर’ हा एक नवीन विभाग आहे, जो कालांतराने विकसित होण्याची शक्यता आहे. यामुळे ईटीएफसारखे केवळ कागदी सोने बाळगणे पसंत नसणाऱ्यांसाठी ‘ईजीआर’ हा तितकाच प्रभावी व फायदेशीर असा पर्यायी मार्ग ठरतो, असे याचे वर्णन बॅनर्जी यांनी केले. हा पर्याय किरकोळ गुंतवणूकदार आणि सराफ या दोघांनाही फायदेशीर ठरेल. शिवाय देशांतर्गत स्पॉट गोल्ड मार्केटला ते अधिक सखोल आणि तरल बनवेल.
