नवी दिल्ली: केंद्र सरकारने सोन्यावरील सीमाशुल्कात दुप्पट वाढ केल्यानंतर देशांतर्गत बाजारात त्याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत. सरकारने आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्के केल्यामुळे, सोन्याची आयात तब्बल ७० टक्क्यांनी घटून २५ ते ३० टनांपर्यंत खाली आली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. यापूर्वी देशात दरमहा सरासरी ७५ ते १०० टन सोन्याची आयात केली जात होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने-चांदी आयात रोखण्यासाठी आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सोने खरेदी मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यांनतर १३ मे पासून सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून वाढवून १५ टक्के करण्यात आले. शुल्कवाढीनंतर अल्पावधीतच त्याचा परिणाम दिसून आला असून आयातीचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे.
आकारमानात घट, पण मूल्यात वाढ!
जरी सोन्याच्या आयातीचे एकूण वजन कमी झाले असले, तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतींमुळे आयात मूल्यात वाढ झाली आहे. मे महिन्यात भारताची सोन्याची आयात वार्षिक तुलनेत ३४ टक्क्यांनी वाढून ३.४१ अब्ज डॉलर झाली. तसेच एप्रिल-मे २०२६ या कालावधीत सोन्याची आयात ६०.१४ टक्क्यांनी वाढून ९.०४ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
मागील आर्थिक वर्षात भारताची एकूण सोने आयात २४ टक्क्यांच्या वाढीसह ७१.९८ अब्ज डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली होती, तर वजनाच्या बाबतीत ती ४.७६ टक्क्यांनी घसरून ७२१.०३ टन इतकी होती.
सरकारचा प्राधान्यक्रम बदलला; क्रूड ऑईल आणि खतांना महत्त्व
भारताच्या एकूण आयातीमध्ये सोन्याचा वाटा ५ टक्क्यांहून अधिक आहे. चीननंतर भारत हा जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक असून, येथील दागिन्यांच्या मागणीमुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्ची पडते.
