Gold Loan Growth In India: सोने तारण कर्जात गेल्या दोन वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. ही कर्जे नोव्हेंबर २०२५ अखेरीस १५.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. सोन्याच्या भावात वाढ झाल्याने सोने तारण कर्जे हा सुरक्षित पर्याय ठरू लागल्याचे ताज्या अहवालातून समोर आले आहे.
‘क्रीफ हाय मार्क’ या पतमानांकन संस्थेने हा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेपर्यंतच्या वर्षभराच्या कालावधीत सोने कर्जात ४२ टक्के वाढ झाली. याचबरोबर नोव्हेंबर २०२४ पर्यंतच्या वर्षभराच्या कालावधीत ही वाढ ३९ टक्के होती. सोने तारण कर्जे नोव्हेंबर २०२३ अखेरीस ७.९ लाख कोटी रुपये होती. ही कर्जे नोव्हेंबर २०२५ अखेरीस १५.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. सोन्याच्या भावात वाढ झाल्याने तारण म्हणून तो भक्कम पर्याय बनला आहे. सोन्याच्या भावातील वाढीमुळे अधिकाधिक कर्जदार कर्जासाठी पात्र ठरत आहेत.
सोने तारण कर्जांपैकी अर्धी कर्जे ही २.५ लाख रुपयांवरील आहेत. याचबरोबर कर्जदारांमध्ये ५६ टक्के पुरूष आहेत. कर्जाची फेड करण्यामध्ये महिला कर्जदार अधिक प्रामाणिक आहेत. सोने तारण कर्जांपैकी ६० टक्के कर्जे सरकारी बँकांनी दिलेली आहेत. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचा सोने तारण कर्जातील वाटा ८.१ टक्के आहे. या कर्जाच्या फेडीच्या स्थितीतही सुधारणा दिसून आली आहे. त्यामुळे बुडीत कर्जांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दक्षिणेतील राज्यांची आघाडी
सोने तारण कर्जांमध्ये दक्षिणेतील राज्यांचा वाटा अधिक आहे. एकूण कर्जांपैकी तीन चतुर्थांश कर्जे दक्षिणेतील राज्यांतील आहेत. या कर्जातील वाढीचा दर गुजरातमध्ये सर्वाधिक ६७ टक्के आहे. त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रात हा दर ५० टक्के आहे. कर्जाची फेड न होण्याचे प्रमाण उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि ओडिशामध्ये सर्वाधिक आहे, असे अहवालात म्हटले आहे.

