मुंबई : सोन्याच्या वाढत्या किमतींचा फायदा केवळ सोनेधारकांनाच नव्हे, तर सोन्याशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनाही होण्याची शक्यता आहे. जागतिक ब्रोकरेज कंपनी जेफरीजने सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे घरगुती सोन्याचे मोनेटायझेशन म्हणजेच सोन्याच्या तारणावर कर्ज घेण्याचे प्रमाण वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर Manappuram Financeला सोन्याच्या या वाढत्या ‘मोनेटायझेशन’ थीमसाठी पसंतीचा शेअर ठरवण्यात आले आहे.
सोन्याच्या किमतीत ३५ टक्क्यांची वाढ
गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत सुमारे ३५ टक्क्यांची वाढ होऊन किंमत प्रति औंस ४,६०० डॉलरच्या आसपास पोहोचली आहे. भारतातील घरगुती सोनेधारकांकडे सुमारे २५ हजार टन सोने असल्याचा अंदाज जेफरीजने व्यक्त केला आहे. मार्च २०२६मध्ये या सोन्याची एकूण किंमत सुमारे ३.९ ट्रिलियन डॉलर होती. सोन्याच्या किमतीत आणखी १० टक्क्यांची वाढ झाल्यास भारतीय कुटुंबांच्या संपत्तीत सुमारे ४०० अब्ज डॉलरची भर पडू शकते. त्याचबरोबर सोन्याच्या तारणावर आणखी २० ते २५ अब्ज डॉलरची कर्जे उपलब्ध होऊ शकतात, असा जेफरीजचा अंदाज आहे.
घरातले सोने कर्जासाठी वापरण्याची शक्यता
भारतीय कुटुंबांकडे मोठ्या प्रमाणात सोने असले तरी त्यातील तुलनेने छोटा हिस्सा औपचारिक बँकिंग आणि एनबीएफसी व्यवस्थेत कर्जासाठी वापरला जातो. मार्च २०२६पर्यंत घरगुती सोन्यापैकी सुमारे १५ टक्के सोनेच मोनेटाइजेशन झाले असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यात सोन्याच्या किमती वाढत राहिल्यास आणि त्यावर कर्ज घेण्याचे प्रमाण वाढल्यास गोल्ड लोन कंपन्यांसाठी मोठी संधी निर्माण होऊ शकते.
गोल्ड लोनमध्ये मोठी वाढ
मार्च २०२६पर्यंत भारतातील गोल्ड लोनचे प्रमाण सुमारे १९७ अब्ज डॉलर झाले होते. गेल्या दोन वर्षांत त्यात डॉलरच्या आधारावर जवळपास ७३ टक्क्यांची वाढ झाली आहे. बँका आणि एनबीएफसीच्या एकूण कर्जामध्ये गोल्ड लोनचा वाटा सुमारे ७ टक्के आहे. पुढील दोन वर्षांत घरगुती सोन्याचे मोनेटाइजेशन आणखी वाढल्यास दरवर्षी अतिरिक्त १५ ते २० अब्ज डॉलरचे गोल्ड लोन निर्माण होऊ शकते, असा जेफरीजचा अंदाज आहे.
कोणते शेअर जेफरीजच्या रडारवर?
सोन्याच्या वाढत्या किमतींचा फायदा घेणाऱ्या कंपन्यांमध्ये जेफरीजने Manappuram Financeला पसंती दिली आहे. त्याशिवाय Muthoot Finance आणि IIFL Finance यांसारख्या गोल्ड लोन कंपन्यांचाही फायदा होऊ शकतो. सोन्याच्या दागिन्यांच्या वाढत्या मागणीमुळे टायटन आणि कल्याण ज्वेलर्स यांच्याकडेही लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर सोन्याच्या व्यवहारातील वाढीचा फायदा एमसीएक्सला होऊ शकतो.
जेफरीजच्या मॉडेल पोर्टफोलिओत बदल
जेफरीजने आपल्या इंडिया मॉडेल पोर्टफोलिओमध्ये सोन्याच्या मोनेटायझेशन थीमवर खेळण्यासाठी मणप्पुरम फायनान्सचा समावेश केला आहे. त्याचबरोबर चांदीच्या थीमचा फायदा घेण्यासाठी जिंदल स्टेनलेसच्या जागी हिंदुस्थान झिंकचा समावेश करण्यात आला आहे. मीशो आणि नवीन फ्ल्युओरीन यांचाही पोर्टफोलिओत समावेश करण्यात आला असून अंबुजाला वगळण्यात आले आहे. मात्र, ब्रोकरेजचे हे मत गुंतवणुकीची हमी नसते. सोन्याच्या किमती, व्याजदर, कर्जवाढ, नियामक बदल आणि संबंधित कंपन्यांची आर्थिक कामगिरी यांचा या शेअरवर परिणाम होऊ शकतो.
