Will gold prices fall or rise in 2026: भू-राजकीय जोखीम, जागतिक कर्ज स्थिरतेबद्दल वाढती चिंता आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सतत होत असलेल्या खरेदीमुळे सोन्याच्या किमती वाढत असल्याचे वर्ल्ड गोल्ड कॉन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड टेट यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी सोन्याच्या किमती कमी होणार की नाही याबाबतही भाष्य केले आहे.
शुक्रवारी रायझिंग भारत समिट २०२६ मध्ये बोलताना टेट म्हणाले की, भू-राजकीय अनिश्चितता ही सध्या सुरू असलेल्या सोन्याच्या तेजीचे एक प्रमुख कारण आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, वेगाने वाढणाऱ्या सार्वभौम कर्जाबाबत (सरकारवरील कर्ज) असलेली सततची भीती आहे.
टेट म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत मध्यवर्ती बँकांनी दरवर्षी एकत्रितपणे सुमारे १,००० टन सोने खरेदी केले आहे आणि ही खरेदी पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.
“सोन्याच्या या संपूर्ण दरवाढीमागे कर्ज हा मुख्य घटक आहे”, असे टेट यांनी नमूद केले. त्यांनी टॅरिफच्या घोषणेनंतर अमेरिकन बाँड यील्डमध्ये झालेल्या तीव्र बदलांसारख्या घटनांकडे लक्ष वेधले. ही तणावाची परिस्थिती केवळ महागाईमुळे निर्माण झालेली नसून, सरकारांच्या कर्ज फेडण्याच्या क्षमतेबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे झाली आहे.
टेट यांनी सांगितले की, भारतासह विकसनशील देशांमधील मध्यवर्ती बँका त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वाढ करत आहेत, कारण पाश्चिमात्य मध्यवर्ती बँकांच्या तुलनेत ते अजूनही “सोने खरेदीच्या बाबतीत मागे” आहेत.
त्यांनी पुढे असेही नमूद केले की, सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतरही, मध्यवर्ती बँका आता सोन्याकडे वारंवार पुनर्संतुलन करण्याच्या मालमत्तेऐवजी एक ‘दीर्घकालीन आणि स्थिर राखीव मालमत्ता’ म्हणून पाहत आहेत.
सोन्याच्या मागणीचा विक्रम
मागणीच्या कलानुसार, टेट यांनी सांगितले की जागतिक स्तरावर सोन्याच्या मागणीने गेल्या वर्षी विक्रमी पातळी गाठली आहे. भारतात, २०२५ मध्ये सोन्याची एकूण मागणी सुमारे ७११ टन इतकी होती. जरी वाढत्या किमतींमुळे दागिन्यांच्या मागणीत घट झाली असली तरी, गोल्ड बार्स आणि नाण्यांमधील गुंतवणुकीच्या मागणीत वर्षानुवर्षे १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे, जे आर्थिक स्थैर्य आणि चलनाच्या जोखमीबाबत गुंतवणूकदारांमध्ये वाढत असलेली चिंता दर्शवते.
ते म्हणाले की, सांस्कृतिक घटकांमुळे भारतातील सोन्याची मागणी रचनात्मकदृष्ट्या भक्कम आहे. मात्र, भविष्यातील वाढ ही प्रामुख्याने पेन्शन आणि विमा निधी यांसारख्या संस्थांकडून येण्याची शक्यता आहे, कारण सोन्याचा समावेश आता वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये अधिक प्रमाणात केला जात आहे.
सोन्याच्या किमती कमी होणार का?
टेट यांनी सांगितले की, केवळ एकाच परिस्थितीत सोन्याच्या किमती लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात आणि ती म्हणजे अमेरिकेच्या आर्थिक विकास दरात ६-७ टक्क्यांपर्यंत वाढ व यासोबत मध्यम महागाई. यामुळे सार्वजनिक कर्ज कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी “अत्यंत कमी” असल्याचे सांगितले.
