Gold Price Surge India 2026: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोन्यातील या तेजीबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, सोन्याच्या दरातील अस्थिरता जागतिक अनिश्चिततेमुळे आहे. या जागतिक अनिश्चिततेमुळेच केंद्रीय बँकाही सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

पीटीआयने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, सीतारमण म्हणाल्या, “यावरून हे देखील दिसून येते की गुंतवणूकदारांना कोणत्याही एका विशिष्ट चलनात विश्वास नाही आणि म्हणूनच सोने खरेदी करण्यासाठी सर्वत्र धावाधाव सुरू आहे.”

सोन्यावरील आयात शुल्कात कोणताही बदल नाही

सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याने सोने सध्या चर्चेत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये सरकार सोने आणि चांदीच्या आयातीवरील शुल्क वाढेवेल अशी बाजाराला अपेक्षा होती. काही विश्लेषकांनी असेही म्हटले होते की सरकार सोन्यासाठीच्या घरगुती मर्यादांमध्ये सुधारणा करू शकते. पण, कोणतेही बदल करण्यात आले नाहीत आणि सोन्याची स्थिती जैसे थे राहिली.

सोन्यात का होत आहे घसरण?

अलीकडच्या काही दिवसांत सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. २९ जानेवारी २०२६ रोजी भारतात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,७५,९३० रुपये होता. आज, म्हणजेच २ फेब्रुवारी रोजी, सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४८,७१० रुपये आहे. ही जवळपास १६% ची घसरण आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून सोन्याच्या किमती वाढत होत्या. पण, ३० जानेवारी रोजी या मौल्यवान धातूच्या किमतीत जवळपास १०% घट झाली, जी १९८३ नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण होती. तज्ज्ञांच्या मते, अतिरिक्त नफावसुली आणि डॉलर निर्देशांकातील वाढीमुळे ही घसरण झाली.

अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम

विश्लेषकांनी निदर्शनास आणून दिले की, केविन वॉर्श यांची यूएस फेडरल रिझर्व्हच्या पुढील अध्यक्षपदी झालेली नियुक्ती मौल्यवान धातूंच्या किमतींवर परिणाम करणारी ठरली, कारण हे माजी फेड गव्हर्नर त्यांच्या कठोर भूमिकेसाठी ओळखले जातात.

तज्ज्ञांनी असेही म्हटले की, चिनी सट्टेबाजांनी किमती विक्रमी उच्च पातळीवर नेल्यामुळे सोने आणि इतर मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली होती. चिनी व्यापाऱ्यांनी बाजारातून बाहेर पडण्यास सुरुवात केल्यावर मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली.