Gold And Silver ETF Crash 7 percent today: जागतिक बाजारात सोन्याच्या किमती पुन्हा वाढत असताना सोने आणि चांदीच्या एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs) मध्ये बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

चांदीशी संबंधित ईटीएफमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल सिल्व्हर ईटीएफ ७.३३ टक्के, निप्पॉन इंडिया सिल्व्हर ईटीएफ ७.१२ टक्के, एसबीआय सिल्व्हर ईटीएफ ७.१८ टक्के आणि टाटा सिल्व्हर ईटीएफ ७.४३ टक्के घसरले आहेत.

गोल्ड ईटीएफमध्येही घसरण झाली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल गोल्ड ईटीएफ ३.८७ टक्के, निप्पॉन इंडिया गोल्ड ईटीएफ ३.३ टक्के, एसबीआय गोल्ड ईटीएफ ३.५२ टक्के आणि टाटा गोल्ड ईटीएफ सुमारे ३.०९ टक्के घसरले आहेत.

मागील सत्रातील घसरणीचा ईटीएफवर दबाव

देशांतर्गत बुलियन ईटीएफ (Bullion ETFs) मधील मोठी घसरण ही प्रामुख्याने मंगळवारी जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचे प्रतिबिंब आहे. मंगळवारी भारतीय शेअर बाजार सुट्टीमुळे बंद होते.

मजबूत अमेरिकन डॉलर आणि लवकरच होणाऱ्या व्याजदर कपातीची धूसर झालेली शक्यता यामुळे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आणि गेल्या सत्रात सोन्याचे दर ४ टक्क्यांहून अधिक घसरून एका आठवड्यातील नीचांकी स्तरावर पोहोचले. त्याच सत्रात चांदीमध्ये त्याहूनही मोठी घसरण पाहायला मिळाली, चांदीचे भाव ८ टक्क्यांहून अधिक कोसळले.

भू-राजकीय तणावामुळे सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा सुधारणा

भू-राजकीय तणाव पुन्हा वाढल्याने बुधवारी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये अंशतः सुधारणा दिसून आली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्पॉट गोल्ड १.६ टक्क्यांनी वाढून ५,१६८.६९ डॉलर प्रति औंसवर पोहोचले, तर अमेरिकन गोल्ड फ्युचर्समध्ये सुमारे १.१ टक्क्यांची वाढ झाली. मागील सत्रातील मोठ्या घसरणीनंतर स्पॉट सिल्व्हरच्या दरात सुमारे ३.५ टक्क्यांची वाढ झाली.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेले वाढते हवाई हल्ले आणि मध्यपूर्वेतील व्यापक संघर्षाच्या जोखमीमुळे जागतिक अनिश्चितता वाढली आहे. परिणामी, सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ‘सेफ-हेवन’ची (सोने आणि चांदी) मागणी पुन्हा वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुधारणा झाली असली तरी, अलिकडच्या काळात ५,३०० डॉलर प्रति औंसच्या विक्रमी उच्चांकावरून घसरल्यानंतर देशांतर्गत सोन्याच्या किमती कमीच आहेत. भारतात, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे २,८००-२,९०० रुपये घसरली आहे, ज्यामुळे किंमत १.६७ लाख रुपयांच्या जवळ आली आहे.