Iran war impact on global gold supply: मध्यपूर्वेतील युद्धामुळे दुबईमध्ये येणारी आणि जाणारी बहुतेक हवाई वाहतूक थांबली असल्याने सोने आणि चांदीच्या जागतिक पुरवठा साखळीत मोठा अडथळा येत आहे. यामुळे या वर्षी आधीच तीव्र चढउतार झालेल्या किमतींमध्ये आणखी अस्थिरता निर्माण होऊ शकते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दुबई हे सोन्याच्या शिपमेंटसाठी एक आघाडीचे केंद्र आहे. गेल्या वर्षी सोन्याच्या जागतिक वाहतूक प्रवाहात दुबईचा सुमारे २० टक्के वाटा होता. यामध्ये आफ्रिकेत उत्खनन केलेले आणि नंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये शुद्ध केलेले सोने तसेच युरोपमधून आशियाकडे पुरवठा केले जाणारे सोने यांचा समावेश आहे.
यामुळेच भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये…
विश्लेषकांचे म्हणणे आहे की जर सोने आणि चांदीची मालवाहतूक दीर्घकाळ विस्कळीत राहिली, तर यामुळे आशियाई बाजारपेठेत प्रादेशिक किमती वाढू शकतात आणि ऐतिहासिक तेजीत असलेल्या सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी अस्थिरता वाढू शकते.
“मध्यपूर्वेकडून विमान सेवा बंद झाल्यानंतर सोन्याची उपलब्धता चिंतेचा विषय बनली आहे”, असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे वरिष्ठ बाजार रणनीतिकार जॉन रीड म्हणाले. “यामुळेच भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये वेगाने वाढ झाली आहे”, असेही त्यांनी नमूद केले.
या आठवड्यात सोन्याच्या किमती सुमारे ३ टक्क्यांनी घसरून सुमारे ५,१०० डॉलर प्रति ट्रॉय औंस झाल्या आहेत, परंतु तरीही त्या वर्षाच्या सुरुवातीपेक्षा जवळजवळ २० टक्क्यांनी जास्त आहेत.
कस्टम्सच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये दुबई हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा निर्यातदार होता आणि भारत त्याच्या निर्यातीसाठी सर्वात मोठा आयातदार होता.
भारताला फटका बसण्याची शक्यता
स्टोनएक्सच्या बाजार विश्लेषण प्रमुख रोना ओ’कॉनेल म्हणाल्या की दुबईतील व्यत्ययामुळे भारताला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, कारण भारताकडे जाणाऱ्या मौल्यवान धातूंसाठी अमीरात हे एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे.
“अल्पकाळात लोक या परिस्थितीवर काहीतरी तोडगा काढू शकतील, पण जर हे संकट दीर्घकाळ टिकले, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते”, असे ओ’कोनेल यांनी म्हटले.
शनिवारपासून इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले सुरू झाल्यामुळे आखाती प्रदेशातील बहुतांश व्यावसायिक विमान वाहतूक थांबवण्यात आली आहे. मंगळवारी दुबईतून मोजक्याच प्रवासी विमानांनी उड्डाण केले, परंतु या विमानांमधून सोने नेले जात नव्हते. कारण लवकर खराब होणाऱ्या मालाला प्राधान्य देण्यात आले होते.
प्रवासी विमानांतून सोन्याची वाहतूक
सामान्यतः सोन्याची वाहतूक प्रवासी विमानांमधून माल (Cargo) म्हणून केली जाते. एका विमानातून एका वेळी पाच टनांपर्यंत सोने नेले जाऊ शकते, ज्याची सध्याच्या भावानुसार सुमारे ८३० दशलक्ष डॉलर इतकी किंमत आहे.
