Sundar Pichai On Google Space Data Centers Plan: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी अंतराळात डेटा सेंटर्स उभारण्याचे संकेत दिले आहेत. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पिचाई म्हणाले की कंपनी क्वांटम कम्प्युटिंगवर काम करत आहे. याबाबत आणखी माहिती देताना ते म्हणाले की, “आमचा चंद्रावरील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे अंतराळात डेटा सेंटर्स उभारणे हा आहे, जेणेकरून सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे वापरता येईल.”

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोर्बन कॅपिटल नावाच्या युजरने सुंदर पिचाई यांच्या या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचेही या व्हिडिओने लक्ष वेधले आहे. यावर एका शब्दात प्रतिक्रिया देताना मस्क यांनी “इंटरेस्टिंग” असे लिहिले आहे.

“गुगलमध्ये आम्हा सर्वांना चंद्रावर प्रकल्प राबवण्याचा अभिमान आहे. या प्रकल्पासाठी दशकभराहून अधिक काळ लागला आहे. आम्ही क्वांटम कम्प्युटिंगवर काम करत आहोत. आमच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणजे अंतराळात डेटा सेंटर्स उभारणे हा आहे. जेणेकरून सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे वापरता येईल. आम्हाला ही डेटा सेंटर्स अंतराळात सूर्याच्या अत्यंत जवळ उभारायची आहेत. यासाठी पहिले पाऊल २०२७ मध्ये टाकले जाईल”, असे सुंदर पिचाई यांनी नमूद केले.

“आम्ही अंतराळात मशीन्सचे छोटे रॅक पाठवून त्यांना उपग्रहांमध्ये स्थापन करणार आहोत. हे रॅक उपग्रहांमध्ये स्थापन केल्यानंतर त्यांची चाचणी करू आणि मग तिथून पुढे त्याचा विस्तार केला जाईल. पण मला यात काही शंका नाही की एका दशकानंतर अंतराळात डेटा सेंटर्स उभारणे सामान्य होईल”, असेही सुंदर पिचाई यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

सुंदर पिचाई यांच्यापूर्वी एलॉन मस्क यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये घोषणा केली होती की स्पेसएक्स पुढील पिढीतील स्टारलिंक उपग्रहांचा वापर करून ऑर्बिटल डेटा सेंटर्स उभारण्यात आघाडी घेईल आणि यामुळे त्यांना पाच वर्षांत सर्वात कमी किमतीचा एआय कंप्यूट पर्याय म्हणून स्थान मिळेल.