नवी दिल्ली : देशातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन सरलेल्या ऑगस्ट महिन्यात वार्षिक आधारावर १४.८ टक्क्यांनी वधारून २ लाख कोटींच्या जवळ १,९९,८५३ कोटी रुपयांवर नोंदवले गेल्याचे मंगळवारी जाहीर आकडेवारीने स्पष्ट केले. देशांतर्गत व्यवहारांतून मिळणारा जीएसटी महसूल ९.३ टक्क्यांनी वाढून १.३७ लाख कोटी रुपयांच्या वर गेला, तर आयातीवरील महसूल २९ टक्क्यांनी वाढून ६२,६०४ कोटी रुपये झाला. ऑगस्ट महिन्यात एकूण केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) संकलन ३८,४१३ कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) संकलन ४६,३१६ कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) संकलन १.१५ लाख कोटी रुपयांवर होते.

ऑगस्टमध्ये जीएसटी परताव्याची (रिफंड) रक्कम ६८ टक्क्यांनी वाढून ३१,७९५ कोटी रुपयांवर पोहोचली. त्यामुळे या महिन्यातील निव्वळ जीएसटी संकलन १.६८ लाख कोटी रुपये इतके होते, जे वार्षिक आधारावर ८.३ टक्क्यांची वाढ दर्शवते. गेल्यावर्षी याच महिन्यात जीएसटी संकलन १.५५ लाख कोटी रुपयांवर होते.

दरम्यान, या अप्रत्यक्ष करप्रणालीबाबत निर्णय घेणारे सर्वोच्च मंडळ असलेल्या ‘जीएसटी परिषदे’ची ५७वी बैठक १२ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. करव्यवस्थेतील पुढील फेरबदलांच्या दृष्टीने या बैठकीतील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाच महिन्यांत महसूल १०.४२ लाख कोटींवर

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंतच्या पाच महिन्यांत एकूण जीएसटी महसुलात ११ टक्क्यांची वाढ झाली असून तो १०.४२ लाख कोटी रुपये झाला आहे. निव्वळ जीएसटी महसूलही ९ टक्क्यांनी वाढून ८.८९ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटी महसुलातील या वाढीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेतील व्यवहारांना तसेच कर अनुपालनाला चालना मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, याच काळात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) ७.८ टक्के वाढ नोंदविण्यात आली.